धारावीतून अपहरण झालेली ५ वर्षाची मुलगी सापडली टिटवाळ्यात

आरोपीच्या विठ्ठलवाडी येथून मुसक्या आवळल्या

धारावीतून अपहरण झालेली ५ वर्षाची मुलगी सापडली टिटवाळ्यात

धारावीतून ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून करणाऱ्या ३२ वर्षीय शिंप्याला विठ्ठलवाडी मधून अटक करण्यात आली आहे.धारावी पोलिसांनी १२तासात या गुन्ह्याचा छडा लावून अपहरण करण्यात आलेल्या मुलीची टिटवाळा येथून सुखरूप सुटका केली आहे.गैरकृत्य करण्याच्या इराद्याने अपहरणकर्त्याने मुलीचे धारवीतून अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

रजब मोहम्मद शाबीर साह (३२)असे अटक करण्यात आलेल्या शिंप्याचे नाव आहे.मूळचा बिहार राज्यातील रजब साह हा मागील काही वर्षांपासून मुंबईतील गोवंडी बैगणवाडी येथे राहण्यास होता. एका गारमेंट मध्ये टेलरिंगचे काम करणाऱ्या रजब याने २० फेब्रुवारी सायंकाळी रोजी धारावीतील हुसेनीया मशीद येथून एका ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण केले होते. अचानक बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईवडीलांनी रात्रभर मुलीचा शोध घेऊन अखेर दुसऱ्या दिवशी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

धारावी पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता त्यात मुलगी एका अनोळखी व्यक्तीसोबत सायन रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले. शोध पथकाने सायन रेल्वे स्थानकावरील कॅमेरा फुटेज तपासले असता अपहरणकर्ता कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन मधून मुलीला घेऊन निघाला गेला होता. अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू असताना मुलगी कल्याण तालुका (टिटवाळा) येथील पोलीसांच्या ताब्यात सुखरूप मिळून आली. धारावी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची वैदयकीय चाचणी केली असता सुदैवाने तिच्यासोबत कुठलेही गैरकृत्य झालेले नव्हते.

हे ही वाचा:

मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या अफगाणी नागरिकाला अटक

बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस, परंतु अधिकाऱ्याला मारलेल्या सॅल्यूटने केला घात!

जे.पी.नड्डा-चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा…

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार!

 

मुलगी सुखरूप मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता पोलिसांच्या खबऱ्यांनी आरोपी गोवंडीतील कारखान्यात काम करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गोवंडीतील गारमेंट कारखाने शोधले असता आरोपी हा काही दिवसांपूर्वी काहीही न सांगता निघून गेल्याची माहिती समोर आली व सध्या तो विठ्ठलवाडी येथे एका गारमेंट मध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने विठ्ठलवाडी येथील गारमेंट कारखाने शोध घेतला असता आरोपी रजब मोहम्मद शाबीर साह हा एका कारखान्यात मिळून आला. धारावी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला धारावी पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरुद्ध अपहरण, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.त्याच्या चौकशीत तो मुलीसोबत गैरकृत्य करण्याच्या इराद्याने मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली.

Exit mobile version