घर घेण्यासाठी सासूने परदेशातून पाठवलेली ४४ लाख रुपयाची रोकड हडप करण्यासाठी लुटीचा बनाव करणाऱ्या जावयाचे पोलिसांनीच पितळ उघडे पाडले आहे. पोलिसांना खोटी खबर देऊन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या ३० वर्षीय जावयाला लुटीमारीचा खोटा बनाव केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, हा प्रकार दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा येथे घडला.
अमीन व्होरा (३०) असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. अमीन हा अंधेरी पश्चिम लोखंडवाला येथे पत्नी आणि दोन मुलीसह भाडेतत्वावर राहण्यास आहे, उच्चशिक्षित असलेल्या अमीन हा इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी चालवतो. त्याची सासू दुबई येथे असून मुलीला मुंबईत घर घेण्यासाठी तिने दुबई येथून अंगडिया मार्फत ४४ लाख रुपयाची रक्कम मुंबईत पाठवली होती. बुधवारी सायंकाळी हि रक्कम घेण्यासाठी अमीन हा दक्षिण मुंबईत आला होता, सायंकाळी त्याने अंगडिया कडून ४४ लाख रुपयाची रोकड घेऊन मोटारीने घराकडे निघाला होता. वाटेत आग्रीपाडा येथे दोन मोटारसायकवरून आलेल्या लुटारूंनी शस्त्राचा धाख दाखवून आपल्या जवळची रोकड लुटल्याची तक्रार अमीन याने रात्री ११ वाजता आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दिली.
हे ही वाचा:
आव्हाडांचे घालीन लोटांगण कशासाठी?
जर्जर बापट घराबाहेर पडले, पण ठाकरे घरीच…
अक्षय कुमार सोडतोय कॅनडाचे नागरिकत्व; पुन्हा होणार भारतीय
जागतिक बँकेवर ‘पुणेरी पाटी’; अजय बंगा यांच्याकडे येणार धुरा
पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु असता घटनास्थळी लुटीची घटना झालेली नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले, तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरात देखील अशी कुठलीही घटना कैद न झाल्यामुळे तक्रारदार हा खोटं बोलत असावा का ? असा संशय पोलिसांना आला. आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे आणि त्याच्या पथकाने तक्रादार अमीन व्होरा यांच्याकडे उलटतपासणी सुरु केली असता त्याने लुटीचा बनाव केल्याची कबुली देत हा बनाव पत्नीला अद्दल घडविण्यासाठी आणि सासूचे पैसे हडप करण्यासाठी केल्याचे पोलिसांच्या तपासात त्याने कबूल केले.
याप्रकरणी पोलिसांनी अमीन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याने मालाड येथे लपवून ठेवलॆली ४४ लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती पाचे यांनी दिली.