गोळीबार करून आरोपीला पकडले, एक पोलीस अधिकारी जखमी
७५ लाखांची लूट करून फरार झालेल्या टोळीतील एका आरोपीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने थरारक पाठलाग करून पकडले. या आरोपीने पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी गोळीबाराच्या पाच फैरी झाडत त्याचा पाठलाग करून अटक केली. या प्रकारात एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले आहे.
बुधवार १७ फेब्रुवारी रोजी मुंबई अमहदाबाद महामार्गावरील सातिवली येथे सहा जणांच्या टोळीने सुपारी घेऊन जाणारा एक ट्रक लुटला होता. या आरोपीनी ट्रकमधील चालकाचे अपहरण करून ७५ लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी रविवारी चारोटी येथून गुजरातला फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीना पकडण्यासाठी विविध ठिकाणी सापळे लावले होते.
सोमवारी रात्री गुन्हे शाखा ३ च्या एका पथकाने खानिवडे टोल नाका येथे आरोपीसाठी सापळा लावला होता. वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद बडाख या पथकाचे नेतृत्व करत होते. रात्री सव्वा दोनच्या सुमारास संशयित आरोपी एका कंटेनरमधून येताना दिसला. पोलिसांनी तो कंटेनर अडवून त्याला उतरायला सांगितले, मात्र त्याने हा कंटेनर पोलिसांच्या अंगावर घातला आणि शिरसाडच्या दिशेने पळाला. या मध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या पथकाने या कंटेनरचा पाठलाग सुरू केला. त्याने शिरसाड फाट्यावरून पुन्हा गाडी विरुध्द दिशेने वळवली. पोलिसांनी त्याला थांबविण्यासाठी कंटेनरवर गोळीबाराच्या पाच फैरी झाडल्या. अखेर २० मिनिटांच्या थरारारक पाठलागानंतर जयवीर राम स्वरूप या आऱोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
हे ही वाचा:
‘भारत एक सनातन यात्रा’ मधील कलाकृतींचे पाहुण्यांनी केले कौतुक!
बँकेत ओळख पटवण्यासाठी हिजाब हटविण्यास मुस्लीम विद्यार्थिनीचा नकार
एक डाव प्रशांतचा…. की पवारांचा ???
‘उत्तर प्रदेशची जनता घराणेशाहीचा पराभव करेल’
आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रस्तावित मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. सुपारीचा ट्रक लुटून फरार झालेल्या सहा आरोपींपैकी हा एक आरोपी आहे. मुख्य आरोपीवर २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. आम्ही या आऱोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करू असा विश्वास पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ महेश पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रकरणातील इतर आरोपी मुलुंड येथे लपून बसले होते, त्यांना अटक करण्यासाठी भायंदर पोलीसांनी मुलुंड पोलिसाची मदत घेतली. मंगळवारी सायंकाळी मुलुंड आणि भायदंर पोलिसांचे पथक या आरोपीना अटक करण्यासाठी गेले असता आरोपीनी पोलिसांवर शस्त्रासह हल्ला करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसानी हवेत गोळीबार करून तिघाना अटक केली आहे.