मेहुण्याच्या हत्येसाठी त्याने चक्क विकली मालकाची मोटार

मरीन ड्राइव्ह पोलिसांनी केली कारवाई

मेहुण्याच्या हत्येसाठी त्याने चक्क विकली मालकाची मोटार

बहिणीच्या पतीची हत्या करण्यासाठी मालकाची मोटार विकून रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे विकत घेणाऱ्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या वाहन चालकाने पोलिसांना दिलेल्या कबुलीत मालकाची मोटार विकून रिव्हॉल्व्हर खरेदी केले होते, त्याच रिव्हॉल्व्हरने मेहुण्याचा खून करणार होतो, परंतु मेहुणा बोलावलेल्या ठिकाणी न पोहचल्यामुळे वाचला अशी माहिती त्याने पोलिसाना दिली.

सुरेश (बदलेले नाव) हा पुण्यातील एका व्यवसायिकाच्या मोटारीवर चालक म्हणून नोकरीला होता. गेल्या महिन्यात हे व्यवसायिक मुंबईतील नरिमन पॉईंट येथे मित्राला भेटण्यासाठी आपल्या खाजगी मोटारीने मुंबईत आले होते. नरिमन पॉईंट येथे एका ठिकाणी त्यांनी चालकाला मोटारीसोबत थांबण्यास सांगून मित्राला भेटायला निघून गेले होते, तेथून परतल्यानंतर मोटार आणि चालक दोघे मिळून न आल्यामुळे त्यांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मोटार आणि चालक सुरेश याचा शोध घेण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या वाटेवरील टोलनाक्यावर असणारे सीसीटीव्ही तपासले असता सुरेश हा पुण्याच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले.

हे ही वाचा:

अंबुजा सिमेंटला अदानींची मजबूती

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

मराठवाड्याची दुष्काळमुक्ती हेच उद्दीष्ट

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

 

तेथून पुढे त्याचा काही थांगपत्ता लागला नाही, काही दिवसांनी चालक घेऊन गेलेल्या मोटारीसह सातारा जिल्ह्यातील पाटण पोलिसांनी चौघांना अटक केली होती व ती मोटार पोलिसांनी जप्त केल्याचे समोर आले. मरीन ड्राईव्ह पोलिसांचे एक पथक पाटणला रवाना झाले व चौकशीत व्यवसायिकांच्या वाहन चालक सुरेश याला आणि इतर तिघीना रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसांसह अटक केली होती व हे चौघे येरवडा तुरुंगात असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांना मिळाली. पोलिसांनी येरवडा तुरुंगात जाऊन या आरोपीची भेट घेतली असता सुरेशला जामीन झाला आहे. तो तुरुंगातून बाहेर पडला असल्याची माहिती इतर तिघांनी दिली.

पोलिसानी त्याच्या गावचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेऊन त्याला गावातून अटक करण्यात आली. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुरेश याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मालकाची मोटार विकून रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे खरेदी केले होते व त्याच रिव्हॉल्व्हरने बहिणीच्या पतीची हत्या करणार होतो अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. बहिणीचा पती न सापडल्याने त्याचे कारस्थान यशस्वी झाले नाही, परंतु ज्याच्याकडून रिव्हॉल्व्हर विकत घेतले त्यांना पाटण पोलिसानी अटक केली.

Exit mobile version