सिने अभिनेता सलमान खानला धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला वरळी पोलिसानी बंगळुरू येथून अटक केली आहे. बिकाराम बिष्णोई उर्फ विक्रम असे अटक आरोपीचे नाव असून त्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा संदेश पाठवला होता.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वरळी येथील नियंत्रण कक्षात असलेल्या व्हॉट्सअॅपवर सोमवारी रात्री धमकीचा संदेश आला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख करत मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे. सलमानला जिवंत रहायचे असेल तर, त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. तसेच, पाच कोटी रुपये द्यावे लागतील. तसे न केल्यास सलमानला जिवंत सोडणार नाही. आमची टोळी आजही सक्रीय आहे, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते.
हे ही वाचा:
लाडकी बहीण योजनेवर टीका करणारी मविआ महिलांना देणार ३ हजार
सदनिकेची विक्री केली, पण खरेदीदाराला मूळ कागदपत्रे न देताच घेतले गृहकर्ज
…आणि उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले!
महाविकास आघाडी नव्हे ही महाअनाडी आघाडी, त्यांना देश, धर्माची चिंता नाही!
धमकीच्या संदेशाची गांभीर्याने दखल घेत वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. त्यावेळी. धमकीचा संदेश हा कर्नाटकमधील बंगळुरू येथून पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार, वरळी पोलिसांनी बंगळुरू येथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत बिकाराम बिष्णोई याला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील सहभाग समोर येताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी बिकाराम बिश्नोई हा मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. तो बिश्नोई समाजाचा असून सलमानवर असलेल्या रागातून धमकीचा संदेश पाठविल्याचा दावा त्याने केला आहे. आरोपी बिकाराम बिश्नोई हा वेल्डिंगचे काम करत असून पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे.