व्यावसायिकाच्या हत्येतील आरोपी सापडला पण तब्बल २० वर्षांनी

त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि शेवटी देश सोडून जाण्याची योजना आखली होती. मात्र तोपर्यंत त्याचा माग पोलिसांनी काढला

व्यावसायिकाच्या हत्येतील आरोपी सापडला पण तब्बल २० वर्षांनी

विलेपार्ले पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाची हत्या झाली होती. या आरोपीला जेरबंद करण्यात तब्बल वीस वर्षांनंतर पोलिस पथकाला यश आले आहे. रुपेश राय (४३) हा गेली २० वर्षे स्वत:ची ओळख लपवून होता. या दरम्यान त्याने टूरगाइडपासून खाणकामगारपर्यंत अनेक कामे केली. अखेर त्याला ठाण्यातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही घटना एप्रिल २००३मध्ये घडली. पीडित दीपक राठोड (२३) हा नवी दिल्लीचा कापड व्यापारी होता. तो व्यवसायासाठी कापडाचे साहित्य खरेदी करण्याकरिता मुंबईला आला होता. त्याच्या ओळखीच्या असणाऱ्या रुपेश राय याने त्याला सोबत आणले होते. या दोघांनी ३१ मार्च रोजी विलेपार्ले येथील हॉटेल नेस्टमध्ये वास्तव्य केले होते.

३ एप्रिल रोजी हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला राठोडचा मृतदेह त्याच्या बेडवर आढळला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. मात्र रूपेशचा मागमूसही नव्हता. सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. रुपेशने तेव्हा राठोडने आणलेले एक लाख ३० हजार रुपये घेऊन बिहारमधील त्याच्या गावी पलायन केले होते. तेथून तो पुणे, भाईंदर, गोवा, रांची, गुजरात, ठाणे अशा विविध ठिकाणी फिरत राहिला. त्याने आपले नाव बदलून अतुल केडिया ठेवले आणि २०१६ मध्ये त्याने रांची येथून या नावाने आधार कार्डसाठी अर्ज केला.

रूपेश याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर, रांची येथील एका खाणीत, मुंबईत बस कंडक्टर म्हणून आणि अखेरीस ठाण्यातील मिठाईच्या दुकानात काम केले, जिथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि शेवटी देश सोडून जाण्याची योजना आखली होती. मात्र तोपर्यंत त्याचा माग काढण्यात पोलिस यशस्वी ठरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये सांताक्रूझ पोलिस ठाण्याचे अधिकारी बिहारमधील रूपेश रायच्या मूळ गावी १५ ते १६ वेळा जाऊन आले. ते गाव म्हणजे एक दुर्गम खेडे होते. तिथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असे. पोलिस अधिकारी रुपेशचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांशी बोलत. या दरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तेव्हाही ते त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांना याची माहिती देत असत, ’ अशी माहिती सहआयुक्त सत्यनारायण यांनी दिली.

हे ही वाचा:

ओडिशा रेल्वे अपघातानंतर परिस्थिती पूर्ववत करणाऱ्यांचे हात ‘हजार’

मुंबई क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद, अयान पठाण सर्वोत्तम खेळाडू

महाराष्ट्राचे राजकारण थुकरट वळणावर

सुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत

रूपेश हा अविवाहित होता. या दरम्यान तो काही जवळच्या कुटुंबसदस्यांच्या संपर्कात होता. गेल्या महिन्यात, सांताक्रूझ पोलिसांच्या पथकाने बिहारमध्ये पंधरवड्यासाठी तळ ठोकला होता. तेव्हा त्यांना रूपेश हा ठाण्यातील मिठाईच्या दुकानात काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रूपेशच्या मुसक्या आवळल्यानंतर रूपेश पोपटासारखा बोलू लागला.

‘राठोडने रूपेशला दिल्लीत गाडी चालवायला शिकवली होती आणि रूपेशला स्वत:चे मोटर ड्रायव्हिंग स्कूल उघडायचे होते. परंतु राठोड यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मुंबईला जाऊन कापड खरेदी करून दिल्लीला विक्रीसाठी आणण्याचा आग्रह धरला. हॉटेलमध्ये जेवण करत असताना यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. रूपेशने राठोडवर बटर चाकू आणि काट्याने वार केले होते. रूपेशवर याआधीही दिल्लीत शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

Exit mobile version