रिक्षातून निघालेल्या एका तरुणीचा मोबाईल फोन खेचून मोबाईल चोराने पळ काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
या चोरट्याला वाकोला पोलिसांनी ८ तासांच्या आत अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी सांताक्रूझ पूर्व गोळीबार रोड नाका ते खार सबवे दरम्यान घडली.
राजू उर्फ जाफर जुम्मन अली शेख (३३) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे. सांताक्रूझ पूर्व गोळीबार नगर झोपडपट्टीत राहणारा राजू उर्फ जाफर यांच्यावर यापूर्वीचे सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती वाकोला पोलिसानी दिली.
सांताक्रूझ पूर्व ययेथील गावदेवी, पाईप लाईन रोड येथे राहणारी शर्वरी कोडसकर (२६) ही तरुणी शनिवारी सकाळी कामावर जाण्यासाठी रिक्षाने जात असताना गोळीबार रोड खार सबवे जवळ वाहतूक कोंडीत रिक्षा थांबताच मोबाईल चोराने तिच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला.
ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच वाकोला पोलीसानी तातडीने या मोबाईल चोरट्याचा शोध घेऊन त्याला वांद्रे पूर्व येथून अटक केली. राजू उर्फ जाफर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
भागीदाराच्याच खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक!
कुटुंबाला मिळाली अपघाताची नुकसान भरपाई तब्बल पाच वर्षांनी!
म्युकरमायकोसिस बुरशीचे जाळे मधुमेहींवर
‘इंडियन आयडल’फेम सायली कांबळेचा कारुळकर प्रतिष्ठानतर्फे खास गौरव
वाकोला पोलिसानी राजू उर्फ जाफर याच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकोला पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि विजय ठोसर , पोउनि निशात धुरी पोउनि संग्राम बागल व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.