त्याचे नाव इनोसंट होते पण पाप करणे हेच त्याचे काम होते. शेवटी पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले.
मुंबई शहरात व उपनगरात उच्चभ्रू वस्तीतील लोकांना तसेच किशोरवयीन मुलांना उच्च प्रतीच्या कोकेनची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली. इनोसंट असे नाव असणारी ही व्यक्ती ड्रग्स विक्रीच्या पापकर्मात गुंतलेली होती.
या व्यक्तीकडून १ किलो ३०० ग्रॅमचे कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत अंदाजे ३ कोटी ९० लाख इतकी असल्याचे कळले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटला माहिती मिळाली होती की, काही नायजेरियन ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार खार परिसरात पोलिसांनी सापळा लावला होता.
आरोपी आणि त्याचा एक मित्र या व्यवसायात ऍक्टिव्ह असल्याचं समोर येतंय. आरोपीचे नाव इनोसंट लॉरेन्स असे असून तो पामबीच रोड, वाशी येथील राहणारा आहे. २०१६ साली आरोपी भारतात आला त्यानंतर त्याने कपड्याचा व्यवसाय सुरू केला. मोहम्मद अली रोडवर त्याने कपड्याचा व्यवसाय सुरू केला होता मात्र त्याचा मुख्य व्यवसाय हा ड्रग्स तस्करी हाच होता, असे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
सायकल ट्रॅकसाठी खर्चाची मूळ रक्कम होती….वाचा!
उद्धव ठाकरे, भूमिपुत्रांना बाजूला करू नका!
नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल
सदर कारवाई पोलिस सह आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलिस आयुक्त वीरेश प्रभू, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप काळे, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटचे संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स. पो.नि. सुशांत बंडगर, सुरेश भोये, शंकर पवळे, राठोड, सौंदाणे, निमगिरे, मांढरे, खारे, राणे यांनी पार पाडली.