महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगत असलेला एक तोतया अनेकांना फसवत होता. त्याला नुकतीच ओशीवरा पोलिसांनी अटक केलेली आहे. संबंधित व्यक्तीचे खरे नाव हे गणेश पालजी देवेंद्र असे आहे. याचे वय ३५ वर्षे असून सध्या हा तोतया पोलिसांच्या कोठडीत आहे.
एका ब्युटीकमध्ये काम करणारा मनोजकुमार हा अंधेरीतील रहिवासी आहे. २ ऑक्टोबरला त्याने घरातील काही सामान खरेदी केले. हे सामान खरेदी झाल्यानंतर तो आपल्या घराकडे जायला निघाला. त्याचवेळी त्याला दोन तरुणांनी हटकले. हे तरुण स्कूटरवरून आले होते. आलेल्या दोन तरुणांनी पालिकेचे कर्मचारी असल्याचे दाखवत त्याला गुटखा खाण्याबद्दल हटकले आणि त्याच्याकडून दंडवसुली केली. ही दंडवसुली करण्याच्या निमित्ताने या दोघांनी त्याला पोलिस कस्टडीची धमकी दिली. त्याला बरोबर नेत त्यांनी त्याच्याकडून साडेचार हजार लुबाडले आणि हे दोघेही पसार झाले.
मनोजकुमार याला घडलेला सर्वच प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी कोणतीही पावती सुद्धा मनोजकुमार यांना दिली नव्हती. तसेच कोणतेही ओळखपत्र दाखवले नाही. त्यामुळे त्यानंतर संशय येऊन मनोजकुमार यांनी ओशीवरा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सीसीटीव्हीच्या आधारे अखेर पोलिसांच्या हाती गणेश पालजी देवेंद्र हा लागला.
हे ही वाचा:
काय होणार भारत-चीन दरम्यानच्या १३व्या चर्चेत?
दसऱ्याआधी पुण्यात पोलिसांनी ‘रावण’ला पकडले
धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार करणारे चार आरोपी मुंबई आणि इगतपुरीचे
अखेर पोलिस चौकशीमध्ये मित्राच्या मदतीने ही फसवणूक केल्याचे त्याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि अटक केली. सध्या पोलिस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.