महिला डेंटिस्टकडे खंडणी मागणाऱ्या एकाला बेड्या

महिला डेंटिस्टकडे खंडणी मागणाऱ्या एकाला बेड्या

महिला डेंटिस्टकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण हा नालासोपारा येथे राहणारा असून ६ महिन्यापूर्वी तो ग्रँटरोड येथे एका मोबाईल रिपेअरिंग दुकानात नोकरीला होता.

फोर्ट येथील रुग्णालयात डेंटिस्ट असणाऱ्या महिला डॉक्टरने ६ महिन्यांपूर्वी मोबाईल फोनमध्ये बिघाड झाल्यामुळे तो फोन दुरुस्तीसाठी ग्रँट रोड येथील दुकानात दिला होता. मोबाईल देण्यापूर्वी या डॉक्टर महिलेने मोबाईलमधील व्हिडीओ डिलीट न केल्यामुळे मोबाईल मध्ये राहून गेले होते. त्यात डॉक्टर महिलेचा पतीसोबत संबंध ठेवल्याचा व्हिडीओ होता.

अटक आरोपीने मोबाईल दुरुस्त करून दिला, मात्र त्यातील या महिला डॉक्टरचे तिच्या पतीसोबत असलेल्या संबंधाचे व्हिडीओ स्वत:च्या मोबाईल मध्ये घेतले होते. ग्रँट रोड येथील नोकरी सुटल्यानंतर त्याला कुठेच कामधंदा मिळत नसल्यामुळे त्याने अखेर या डॉक्टर महिलेच्या व्हिडीओच्या माध्यमातून महिलेकडून पैसे उकळण्याचे ठरवले.

हे ही वाचा:

अकरावीच्या सीईटी प्रवेशात संकेतस्थळ नापास

चिपळुणात ज्यादाच्या एनडीआरएफच्या तुकड्या पाठवा

विषप्राशन करून नवदाम्पत्याने संपविले जीवन

कोकणच्या मदतीला दिल्ली तत्पर

आरोपी तारीक हाजीरूर रहेमान (२७) यांच्याकडे महिलेचा मोबाईल क्रमांक होता. काही दिवसांपूर्वी त्याने या डॉक्टर महिलेच्या मोबाईलवर फोन करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची मागणी केली. या डॉक्टर महिलेने याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला. महिलेकडे प्रथम चौकशी केली असता ६ महिन्यांपूर्वी ग्रँट रोड येथील एका दुकानात मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्याची माहिती महिला डॉक्टरने पोलिसांना दिली. एमआरए पोलिसांनी ताबडतोब मोबाईल दुरुस्ती दुकानदाराचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या कडे काम करणारा तारिक रहेमान हा मोबाईल दुरुस्ती करायचा असे सांगितले. पोलिसानी तारिक याचा शोध घेऊन बुधवार त्याला नालासोपारा येथून अटक केली आहे.

Exit mobile version