तरुणीने लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीच्या भावाचे अपहरण करून फरार झालेल्या आरोपीला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. तळोजा पोलिसांनी गुन्हा घडल्याच्या नंतर अवघ्या पाच तासांत आरोपीचा शोध घेऊन मुलाची सुखरूप सुटका केली. आरोपीबद्दल कोणतीही माहिती नसताना तळोजा पोलिसांनी कौशल्यपूर्वक प्रकरणाचा तपास करून आरोपीला जेरबंद केल्याचे परिमंडळ- १ चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. मजिरूल मसुरुद्दिन हक्क (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मसुरुद्दिन हा तळोजा येथील पेंधर गावात राहत होता. तो एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मसुरुद्दिन तरुणीला वारंवार लग्न करण्याची विनवणी करत होता. मात्र तरुणी त्याला वारंवार नकार देत होती. त्यानंतर मसुरुद्दिनने चार महिन्यांपूर्वी मुलीच्या आईकडे त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरही त्याने तरुणीच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला होता.
हे ही वाचा:
सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा
चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?
‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’
मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे
मसुरुद्दिनने ७ जुलै रोजी संध्याकाळी तळोजा एमआयडीसी तरुणीला अडवून लग्न करण्यास जबरदस्ती केली होती. तरुणीने त्यास विरोध केल्यावर त्याने तरुणीला मारहाण केली होती. तसेच लग्न न केल्यास तिच्या चार वर्षांच्या लहान भावाला पळवून नेऊन ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या धमकीनुसार मसुरुद्दिनने शुक्रवारी दुपारी तरुणीच्या भावाचे अपहरण केले. त्यानंतर तरुणीने तळोजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून भिवंडी, कुर्ला जंक्शन, कल्याण व सीएसएमटी जंक्शन येथे पाठविण्यात आली. आरोपी भिवंडी परिसरात असून तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम आणि त्यांच्या पथकाने भिवंडी बस स्थानकाजवळून मसुरुद्दिनला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या ताब्यात असलेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.