एका तासात डझनभर मोबाईल फोन हातातून खेचून चोरी करणाऱ्या एका सराईत मोबाईल चोराला माटुंगा पोलिसांनी त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या दोघांनी मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या नागरिकांना लक्ष करून दुचाकीवरून एका तासात माटुंगा आणि रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ जणांचे मोबाईल फोन खेचून पळ काढला होता.
समीर उर्फ गोल्डन इम्रान शेख (१८) आणि आरिफ गुलाम रसूल शेख उर्फ सिम्बु (२१) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास माटुंगा पाच गार्डन, माहेश्वरी उद्यान या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी करणाऱ्या १२ नागरिकांचे मोबाईल फोन मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी खेचून पोबारा केला होता. त्यानंतर या दोघांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जणांचे मोबाईल फोन खेचले होते.
या दोन्ही घटना एका तासातच घडल्या होत्या. माटुंगा येथे घडलेल्या घटनेत दोन पोलिसांचे मोबाईल फोन चोरीला गेले होते. एकाच दिवशी आणि एका तासातच १२ जणांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
असा लागला शोध …..
माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि युनूस शेख आणि भरत गुरव या अधिकऱ्यानी तात्काळ चोरीला गेलेल्या सर्व मोबाईल फोनवर ‘एसएमएस’ टाकून चोरलेल्या मोबाईल फोन पैकी एक तरी मोबाईल फोन सुरू असेल आणि मोबाईल चोराचा माग काढता येईल या हेतूने मेसेज टाकले होते.
चोरट्यानी एकाच वेळी एवढे मोबाईल चोरले की होते की त्यापैकी दोन मोबाईल फोन स्विचऑफ करण्याचे विसरले होते. पोलिसांनी टाकलेल्या एसएमएस मुळे त्या दोन मोबाईलचे शेवटचे लोकेशन शिवाजी नगर गोवंडी येथे मिळून आले. पोलिसांनी लोकेशन मिळून आलेल्या ठिकाणी या चोरांचा शोध घेण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि माटुंगा येथील सीसीटीव्ही तपासले असता दोन्ही ठिकाणी मोबाईल चोर एकच असल्यामुळे पोलिसांना खात्री झाली.
पोलिसांनी या दोघांचा शोध घेत त्याच्या घरी दाखल झाले मात्र दोघे सापडले नाहीत. दोघांचा शोध सुरू असताना शिवाजी नगर पोलिसांनी या दोघांना मंगळवारी अटक केली. माटुंगा पोलिसानी बुधवारी या दोघांचा ताबा घेऊन त्यांना अटक केली असून या दोघांकडून चोरलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले हे दोघे सराईत मोबाईल फोन चोर असून या दोघांवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वपोनि. दीपक चव्हाण यांनी दिली.
चोरलेले फोन विकत घेणारे….
गोवंडी शिवाजी नगर हे चोरीचे मोबाईल फोन विकत घेण्याचे हब बनले आहे. या ठिकाणी नावापुरते मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन रिपेअरिंग चे दुकान थाटून बसलेल्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात चोरीच्या मोबाईल फोन तस्करी करण्यात येत आहे. हे दुकानदार मुंबई शहरात तसेच रेल्वेत चोरलेले मोबाईल फोन कमी किमतीत विकत घेऊन या मोबाईलचे सर्व भाग सुटे करून किंवा आयएमआय क्रमांक बदलून हे मोबाईल आणि सुटे भाग नेपाळ, बांगलादेश,आसाम या ठिकाणी त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत आहे. या ठिकाणी दिवसाला हजारो चोरीच्या मोबाईल फोनची खरेदी विक्री आणि तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.