जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या एका निरीक्षकाने एका व्यापाऱ्याच्या कार्यलयात बनावट कारवाई रचून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा छापा बेकायदा असल्याचे उघड होताच लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून निरीक्षकासह या कारवाईत त्याच्यासोबत असलेल्या इतर चौघांनाही अटक केली आहे.
व्यापारी जोईतकुमार भोमचंद जैन यांच्या मुंबईत अनेक ठिकाणी स्वतःच्या इमारती आहेत. या इमारतीमधील खोल्या पगडी तत्त्वावर दिल्या आहेत. भाडेकरुंकडून दरमहिना भाडे वसूल करण्यासाठी काही कर्मचारी जैन यांच्याकडे काम करतात. भाडेकरूंनी दिलेले भाडे कार्यालयात जमा करून ते नंतर बँकेत भरले जाते. काळबादेवी येथील कार्यालयात लालचंद वाणीगोता आणि इतर काही कर्मचारी असताना पाच जण त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने जीएसटी निरीक्षक असल्याचे ओळखपत्र दाखवत कार्यालयाची झडती सुरू केली. पाच जणांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले.
हे ही वाचा:
…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे
विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!
तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी
लसीकरणात भारताची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे
कार्यालयातील जवळपास ३० लाख रुपयांची रक्कम या जीएसटी अधिकाऱ्यांच्या हाती लागली. ही रक्कम एकत्र टेबलवर ठेऊन काही हिशोब करत असल्याचे भासविले. त्यानंतर रक्कमेतून ११ लाख रुपये काढून घेतले. ११ लाख रुपये अनधिकृतपणे जमा केले असून, माझगाव येथील जीएसटी कार्यालयात येऊन भेटा, असे त्यांना सांगण्यात आले. नंतर हे अधिकारी निघून गेले.
कर्मचाऱ्यांनी घडलेली घटना व्यापाऱ्याला सविस्तर सांगितल्यावर व्यापाऱ्याने जीएसटी कार्यालयात जाऊन चौकशी केली. कार्यालयात त्यांनी कारवाईबद्दल आणि जप्त केलेल्या रक्कमेबद्द्ल चौकशी केली असता, अशी कोणतीही कारवाई जीएसटी कार्यालयाकडून केली गेली नसल्याचे त्यांना समजले. जीएसटी कार्यालयामार्फत कारवाई करताना पंचांना सोबत नेले जाते आणि जप्त केलेली सर्व रक्कम सील केली जाते. या प्रकरणात असे काहीच घडले नसल्याने सर्व संशयास्पद होते. व्यापाऱ्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाची तक्रार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि खबरे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जीएसटी निरीक्षकासह इतर आरोपींना अटक केली.