भांडुपमधील एका गुंडाने त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये या गुंडावर असलेल्या गुन्ह्यांचे कलम असलेले केक लावण्यात आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भांडुप पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओ दखल घेऊन या गुंडासह त्याचा भाऊ आणि त्याचे इतर सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली.
जियाउद्दीन अन्सारी (२७) असे या गुंडाचे नाव आहे. जियाउद्दीन अन्सारी हा भांडुप पश्चिम येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, मारामारी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व गुन्हे २०१५ पासून दाखल आहे.
मागील दोन दिवसांपासून सोशल मिडियावर जिया अन्सारीने त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये जिया अन्सारी हा वाढदिवसाचा केक कापताना दिसून येत आहे, त्यात त्याच्या समोर मांडलेल्या केकवर ‘भांडुप किंग जिया’ आणि त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याचे कलमे लिहिण्यात आली आहेत. भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०७, ३८१ , ३२४ आणि शेवटच्या केकवर ? प्रश्नचिन्ह असे कलम टाकण्यात आले.
हे ही वाचा:
… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम
मुर्शिदाबादमधील हिंसाचार, मृत्यूंच्या चौकशीसाठी हवे विशेष पथक
मोदींनी बूट देऊन कैथलच्या ‘रामा’चा संपवला वनवास!
मुझफ्फरनगर: तरुणीचा हिजाब उतरवायला लावून सोबतच्या हिंदू तरुणाला मारहाण
जिया अन्सारीने भांडुप मध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून या व्हिडीओची पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) विजयकांत सागर यांनी दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश भांडुप पोलिसांना देण्यात आले. भांडुप पोलिसांनी जिया अन्सारी (२७), त्याचा मोठा भाऊ फिरोज आणि इतर त्याचे सहकाऱ्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७०, १२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जिया अन्सारी आणि त्याच्या सहकाऱ्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर यांनी दिली आहे.