लहान मुलांची चोरी करून त्यांना भीक मागायला लावणाऱ्या एका महिलेला तिच्या दोन अल्पवयीन मुलींसह बोरिवली रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या तिघींच्या अटकेने महाराष्ट्रात गाजलेल्या अंजनाबाई गावित प्रकरणाची आठवण करून दिली.
९०च्या दशकात महाराष्ट्रभर गाजलेले अंजनाबाई गावित प्रकरण अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अंजनाबाई आणि तिच्या दोन मुली मिळून संपूर्ण महाराष्ट्रात लहान मुलांची चोरी करून त्यांना भीक मागायला लावत होत्या. त्रास देणाऱ्या मुलाची या तिघीनी क्रूरपणे हत्या देखील केली होती. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिल्लीतील या तीन मायलेकी करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बोरिवली येथून चोरीला गेलेल्या ३ वर्षाच्या मुलाचा शोध घेत असताना बोरिवली पोलिसांनी दिल्लीला पळून जाण्याचा बेतात असलेल्या या तिघीना दादर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे. या तिघीजवळून बोरिवली येथून पळवून नेलेल्या ३ वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणी बोरिवली पोलिसानी मुलं चोरी प्रकरणात या महिलेला अटक केली असून तिच्या दोन्ही अल्पवयीन मुलींची रवानगी महिला बालसुधारगृहात केली आहे. त्यापैकी एकीचे वय १० वर्षे तर दुसरीचे १७ वर्षे असून अटक करण्यात आलेल्या महिलेचे वय ३३ वर्षे आहे. या तिघी मूळच्या दिल्ली येथे राहणाऱ्या असून दिल्लीत त्या भीक मागण्याचा धंदा करतात. लहान मुलांना बघून जास्त भीक मिळते म्हणून दिल्लीत लहान मुलांना मोठी मागणी आहे, अशी माहिती चौकशीत समोर आली.
हे ही वाचा:
दादर, प्रभादेवीत का होतोय राडा?
पाकिस्तान विरुद्ध विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त
ज्ञानवापी मशिदीत हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार अबाधित
या तिघी काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या होत्या व गणेशोत्सव गर्दीत मिसळून लहान मुलांची चोरी करून दिल्लीला पळून जाण्याचा बेतात होत्या. परंतु मुंबई पोलिसांचा मुंबईतील कडक बंदोबस्त बघून त्यांनी बोरिवली स्थानकावरून एकाच मुलाची चोरी करून दिल्लीला जाणार होत्या व या मुलाला भीक मागणाऱ्या टोळीकडे विकणार होत्या, परंतु तत्पूर्वीच या तिघींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडे कसून चौकशी सुरू असून मुंबईतून बेपत्ता झालेल्या लहान मुलांबाबत तिच्याकडे चौकशी केली जात आहे . तसेच दिल्लीत पोलिसांचे एक पथक तपास कामी जाणार असून मुले विकत घेणाऱ्या टोळीचा तसेच भिख मागणाऱ्या लहान मुलांची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.