ब्रॅण्डेड घडाळ्यांची हौस अनेकांना असते. परंतु ब्रॅण्डेडच्या नावाखाली जेव्हा फसवणूक होते, तेव्हा मात्र चांगलीच पंचाईत होते.
ताडदेव येथील हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या चौकडीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून जवळपास साडेसोळा लाख किमतीची ब्रँडेड कंपनीच्या नावे असलेली बनावट घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
ब्रॅन्डेड कंपन्यांच्या नावाखाली स्वस्तामध्ये ही घड्याळे विकली जात होती. हिरा पन्ना येथील अनेक दुकानांमध्ये वस्तू स्वस्त मिळतात. म्हणूनच या बाजाराकडे अनेकजणांचा ओढा असतो. खास उच्चभ्रू वस्तीमधला हा बाजार ब्रॅन्डेड वस्तूंसाठी ओळखला जातो. म्हणूनच मुंबईकरांसाठी हा बाजार एक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या बाजारात बनावट घड्याळ विक्री होत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. यावेळी गाळा क्रमांक 54, 68, 74, 97 येथे छापा टाकण्यात आला.
हे ही वाचा:
‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे’
‘चितळे एक्स्प्रेस’ची आता इथेही शाखा!
केंद्रीय मंत्र्याला अटक करतात; पण माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही
बंदीचा उत्सव; दर्शनाला बंदी, जमावबंदी, संचारबंदी
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट येथील मुसाफीरखाना परिसरात बनावट घड्याळ विक्री करणाऱ्या दुकानदाराला मुंबई एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ७८ हजार ३९० रुपये किमतीची घडाळे जप्त करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ ताडदेव येथील प्रसिद्ध हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमधील एका शॉपमध्ये बनावट घड्याळांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १६ लाख ४६ हजार किमतीची बनावट घड्याळे मिळाली आहेत. त्यांनी ही घड्याळे कुठून व कशी मिळवली? यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांची ही कारवाई सुरू होती.