मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोगस जामीनदार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील ५ जणांना अटक करण्यात आली असून टोळीकडून मोठ्या प्रमाणात जामिनासाठी लागणारे बोगस कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आलेली आहे. मागील वर्षभरापासून ही टोळी बोगस कागदपत्राच्या आधारे जामीनदार उभे करून न्यायालयाची फसवणूक करीत होती.
अमित नारायण गिजे ( ४४),बंडु वामन कोरडे (४४),अहमद कासिम शेख (४४),संजीव सोहनलाल गुप्ता (३४) उमेश अर्जुन कावले (४८) असे अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव असून या टोळीतील बंडू आणि संजीव गुप्ता यांच्याविरुद्ध यापूर्वी ४ ते ५ गुन्हे दाखल असून त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
जामिनावर बाहेर पडल्यानंतर या टोळीने वर्षभरापूर्वी मानखुर्द महात्मा फुले नगर येथे घर भाडयाने घेऊन त्या ठिकाणी न्यायालयात जामिनासाठी लागणारे बोगस कागदपत्रे तयार करून मजुरी काम करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयात जामीनदार म्हणून उभे करीत होते.
गुन्ह्याची गंभीरता तसेच आरोपीची आर्थिक परिस्थिती बघून जामिनासाठी ही टोळी १० हजार पासून १ लाख रुपये एवढी रक्कम घेत होते, जामीनदार म्हणून उभे राहणाऱ्या मजुराला एका जामिनासाठी २ ते ३ हजार रुपये मोबदला देण्यात येत होता अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली.
या टोळीकडून आठवड्यातून तीन ते चार जणांना बोगस कागदपत्राच्या आधारे जामीन मिळवून देण्याचे काम करीत होती. मागील वर्षभरात या टोळीने विविध गुन्ह्यात अटक असलेल्या शेकडो आरोपीना बोगस कागदपत्राच्या आधारे जामीन मिळवून दिले असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे.
हे ही वाचा:
भाजपच्या स्थापनादिनी एक लाखांहून अधिक लोक पक्षात सामील होणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर!
सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!
मुंबई गुन्हे शाखा कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने या टोळीच्या मानखुर्द येथील घरावर छापा टाकून ५ जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, वेगवेगळया कंपन्यांचे ओळखपत्रे, पॅनकार्ड, महानगर पालिकेच्या कर पावत्या, एक लॅपटॉप, एक मल्टीपल प्रिंटर, एक मिनी लॅमिनेटर, एकाच इसमाचे वेगवेगळया नावांनी तयार केलेली आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँक स्टेमेंट, सॉलव्हनसी, विविध कंपन्यांची ओळखपत्रे इत्यादी बनावट कागदपत्रे हस्तगत करण्यात आलेली आहेत.
या टोळीच्या बोगस जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपीची माहिती मिळविण्यात येत असून ही माहिती संबंधित न्यायालयाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली, तसेच टोळीच्या संपर्कात वकील आहेत का याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.