इको गाड्यांचे सायलेन्सर चोरी प्रकरणातील तीन आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. सायलेन्सर चोरी करून त्याचा उपयोग ज्या कारणासाठी केला जात होता, ते पाहून पोलिसही हबकले.
गेल्या काही वर्षांपासून ही टोळी चोरलेल्या सायलेन्सरमधील मातीतून सोने तयार करत असल्याची माहिती उघड झाली आहे. सदाम मणिहार, मुश्ताक शेख आणि सुजित यादव अशी या तीन आरोपींची नावे असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
गेल्या महिन्याभरात कांदिवली पोलीस ठाण्यात इको गाडीच्या सायलेन्सर चोरीच्या दोन गुन्ह्यांची नोंद झाली होती. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अविनाश पवार यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता सीसीटीव्हीच्या चित्रणात त्यांना एक गाडी दिसली आणि तपासाला वेग आला. चौकशीसाठी पोलिसांनी मुश्ताकला ताब्यात घेतले आणि त्याने सदाम आणि सुजितचे नाव घेतले. तिघांची कसून चौकशी केली असता चोरीबद्द्लची नवीन माहिती समोर आली.
हे ही वाचा:
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
अफगाणिस्तानच्या मदतीला भारत गेला धावून
तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा
मुश्ताक हा रात्रीच्या वेळी रेकीसाठी बाहेर पडत असे आणि रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या इको गाडीचे सायलेन्सर चोरायचा. चोरलेल्या सायलेन्सरमधून ते माती काढून ती माती वितळवून सोने तयार करत असत. एका इको गाडीच्या सायलेन्सरमधून साधारण एक किलो माती बाहेर येते. हे तिघेही ही माती काढून २० ते २५ हजारांना विकत होते. काम झाल्यावर सायलेन्सर नाल्यात फेकून देत असत. प्राथमिक तपासामध्ये या टोळीने आतापर्यंत ३५ हून अधिक गाड्यांचे सायलेन्सर चोरल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.