कोरोनाकाळात काही प्रमाणात कमी झालेली दूध भेसळ पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. पोलिसांनी मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत दूध भेसळ प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. दोन्ही ठिकाणांहून पोलिसांनी तब्बल एक हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करून तो साठा नष्ट केला. अस्वच्छ पाणी आणि सुमार दर्जाची पावडर मिसळून ही भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी सुरेश पार्णीकर, पराश फुल्लेपडेला, विनोद गौड, व्यकंन्ना सिंगाराम, स्वामी पालसम या आरोपींना अटक केली.
गुन्हे शाखा युनिट ७ चे सहाय्यक निरीक्षक सुनयना सोनावणे यांना घाटकोपर पूर्वेकडील गुरुनानक नगरामध्ये दूध भेसळ करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळाली होती. प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्यांनाही सोबत घेतले. दिवस उजाडायच्या आधी अंधारात ही भेसळ करत असल्यामुळे पोलिसांच्या पथकाने पहाटे या परिसरात छापा टाकला. तेव्हा अमूल, गोकुळ आणि गोविंद या दूध कंपनींच्या दुधाच्या पिशव्या फोडून त्यामध्ये बादली आणि पिंपातील साठवलेले अस्वच्छ पाणी भरले जात होते. ही भेसळ करताना पोलिसांनी सुरेश पार्णीकर, पराश फुल्लेपडेला, विनोद गौड, व्यकंन्ना सिंगाराम यांना पकडले. पोलिसांनी या ठिकाणाहून ६१९ लिटर भेसळयुक्त दुधासह वेगवेगळ्या कंपनीच्या दुधाच्या १,६५५ पिशव्या आणि भेसळ करण्यासाठी लागत असणारे साहित्य जप्त केले.
ही वाचा:
प्रमोद भगतने मिळवले पॅरालिम्पिकमधील चौथे सुवर्ण पदक
जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा
कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं?
भारताने गाठला परकीय चलन साठ्याचा उच्चांक
गुन्हे नियंत्रण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पहाटे साडेचारच्या सुमारास डी. एन. नगर परिसरात छापा टाकला आणि स्वामी पालसम याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ४६७ लिटर भेसळयुक्त दूध आणि पिशव्या, इतर साहित्य जप्त केले.