वयोवृद्धांना लक्ष करणाऱ्या ‘बोलबच्चन ‘टोळीतील म्होरक्याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. संजय मांगरे (५०) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील म्होरक्याचे नाव असून त्याचा सहकारी विजय तांबे हा फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
संजय मांगरे हा मच्छिमार नगर माहीम येथे राहणारा असून त्याच्यावर मुंबईत २८ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.कांदिवली पूर्व येथे राहणारे सुभाष महिंद्रकर (६२) हे २३ जून रोजी बोरिवली पूर्व येथून जात असताना एक इसम त्यांच्याजवळ आला व त्याने महिंद्रकर यांना नमस्कार करून ओळखल का ? असे विचारून या ठिकाणी आपले सोन्याचे दुकाने आहेत, या कधी दुकानावर असे बोलून पुढे पोलिसांची तपासणी सुरु आहे, तुमच्याजवळचे सोन्याचे दागिने काढून बॅगेत ठेवा असे सांगितले, व त्यांना दागिने काढण्यास सांगून एका रुमालात गुंडाळून तो रुमाल महिंद्रकर यांना देऊन पिशवीत टाका आणि घरी गेल्यावर बाहेर काढा असे सांगून निघून गेला.
काही वेळाने महिंद्रकर यांनी रुमालातून दागिने काढण्यासाठी पिशवीतून रुमाल काढला असता रुमालात त्यांना दागिने मिळून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिंद्रकर यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका फुटेज मध्ये आरोपी आढळून आला.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशातील शाळा-कॉलेजची ‘सफाई’; व्यवस्थापकीय मंडळातून गुंड, माफिया बाहेर
कार्यालयात घुसून माजी कर्मचाऱ्याने आपल्या माजी ‘बॉस’ला तलवारीने केले ठार
उत्तर भारतातील धुवाँधार पाऊस हा हवामान बदलाचा परिणाम नव्हे!
कलम- ३७० विरोधातील याचिकांवर २ ऑगस्टपासून सुनावणी
पोलिसांनी खबऱ्याच्या मार्फत या आरोपीची माहिती काढली असता सादर आरोपी हा माहीम येथे राहणार असल्याची माहिती मिळाली कस्तुरबा मार्ग पोलिसांनी माहीम येथून संजय मांगरे याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता मांगरे हा हा बोलबच्चनगिरी करून वयोवृद्ध महिला पुरुषांना लक्ष करून त्यांची फसवणूक करीत होता.
त्याच्या टोळीत तिघे जण असून त्यातील विजय तांबे आणि आणखी एक सहकारी असून दोघे फरार असून त्याच्या कसून शोध घेण्यात येत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या टोळीवर पश्चिम आणि उत्तर मुंबईत २८ ते ३० गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.