केअरटेकर म्हणता म्हणता जीवावर उठला! वृद्धाचा मृत्यू

पोलिसांनी केली धडक कारवाई

केअरटेकर म्हणता म्हणता जीवावर उठला! वृद्धाचा मृत्यू

चोरी करण्याच्या उद्देशातून केअरटेकरने एका वृद्ध दाम्पत्यावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री जोगेश्वरी पूर्वेत घडली.या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यु झाला असून ६८ वर्षीय महिलेवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान मुंबईतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २९ वर्षीय केअरटेकरला दादर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. सुधीर चिपळूणकर (७०)असे हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धाचे नाव असून सुप्रिया या त्यांच्या पत्नी हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. चिपळूणकर दाम्पत्य जोगेश्वरी पूर्व मजास वाडी येथील श्री समर्थ सोसायटीत राहण्यास होते. या दाम्पत्यास एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही परदेशात राहण्यास आहेत.

हे ही वाचा:

सत्यजित तांबे ट्विटमधून नेमके म्हणताहेत तरी काय?

महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

मोदी मुंबईत आल्याने मविआत पोटदुखी

पीएमश्री योजनेतून ८१६ शाळांचा होणार कायापालट

या दाम्पत्यांची देखभाल करण्यासाठी मुलाने २५ दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात राहणाऱ्या पप्पू गवळी (२९) या तरुणाला केअरटेकर म्हणून ठेवले होते. केअरटेकर असणाऱ्या पप्पू याने काही दिवसांपूर्वी या दाम्पत्यांच्या घरात चोरी करून पळून जाण्याची योजना आखली होती, सोमवारी त्याने आपली बॅग भरून इमारतीच्या वॉचमनच्या कॅबिन मध्ये अगोदरच आणून ठेवली होती, सायंकाळी त्याने घरात चोरी करण्याचा प्रयत्न करताना या दाम्पत्याने त्याला रंगेहात पकडताच त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, केअरटेकर पप्पूने घरातून चाकूने या दाम्पत्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

दरम्यान सुप्रिया यांनी त्याला विरोध करत घरातील भांडे खिडकीतून बाहेर फेकण्यास सुरुवात केली. चिपळूणकर दाम्पत्यांच्या घरात काहीतरी गडबड असल्याचे समजून इमारतीच्या खाली खेळणाऱ्या मुलांनी या दाम्पत्याच्या घराकडे धाव घेऊन घराची बेल वाजवली असता केअरटेकर पप्पूने दार उघडून मी डॉक्टरांना घेऊन येतो असे सांगून तेथून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दाम्पत्याना नानावटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सुधीर चिपळूणकर यांना मृत घोषित केले व सुप्रिया यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून केअरटेकरचा शोध घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पप्पू गवळी याला दादर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मधून ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांडले यांनी दिली.

Exit mobile version