पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे १९९० साली घडलेल्या जबरी चोरी आणि दरोड्यातील आरोपी तब्बल ३२ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे.मागील ३२ वर्षांपासून स्वतःची ओळख तसेच जागा बदलणाऱ्या या आरोपीला भायंदर पूर्व येथून अटक करण्यात आली आहे. बोरिवली पोलिस ठाण्याच्या पोलीस पथकाने शनिवारी ही कारवाई केली आहे.
विश्वनाथ उर्फ बाळा विठ्ठल पवार (७८) असे ३२ वर्षांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विश्वनाथ हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे राहणारा आहे. बोरिवली पश्चिम येथे १९९० साली जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हा घडला होता.
या गुन्हयात बोरिवली पोलिसांनी सर्व आरोपीना अटक केली होती, त्यात विश्वनाथ उर्फ बाळा याचादेखील समावेश होता. मात्र या गुन्हयात विश्वनाथ उर्फ बाळा हा जामिनावर बाहेर पडला होता. जामिनावर बाहेर पडताच विश्वनाथ फरार झाला होता. तो न्यायालयात तारखेला देखील येत नसल्यामुळे न्यायालयाने वेळोवेळी त्याला वॉरंट जारी केले होते, परंतु विश्वनाथ हा पोलिसांना सापडत नसल्यामुळे अखेर न्यायालयाने १९९३ मध्ये विश्वनाथ याला फरार घोषित करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
भारताच्या एलओसीवर विराजमान होणार छत्रपती शिवाजी महाराज
केदार धाम मंदिराचे दार या तारखेला उघडणार
देशातील हिंसाचारात ८० टक्क्यांनी घट
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ
फरार आरोपीचा शोध घेऊन त्यांना न्यायालया त हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर बोरिवली पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम राबविली, विश्वनाथ याच्या वेंगुर्ला गावी देखील पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नव्हता. दरम्यान विश्वनाथ उर्फ बाळा हा भायंदर पूर्व येथे राहण्यास असल्याची माहिती शोध पथकाला मिळाली. शोध पथकाने भायंदर येथे त्याची माहिती काढण्यात आली असता तो वारंवार जागा बदलून राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भायंदर येथे आपले खबऱ्यांच्या माहितीवरून शनिवारी सापळा रचून त्याला अटक केली.