सैन्याचा गणवेश परिधान केलेल्या एक व्यक्तीला कुलाबा पोलिसांनी अटक केली. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे मुंबईतील पर्यटन स्थळांना भेट देण्यास बंदी आहे. ३ ऑगस्ट रोजी एक व्यक्ती सैन्याचा गडद निळ्या रंगाचा गणवेश घालून गेट वे ऑफ इंडिया जवळ आला.
पोलिसांनी प्रवेशासाठी रोखले असता ‘मी सैन्यात आहे; मला जाऊ द्या.’ असे या व्यक्तीकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळावर गर्दी होऊ नये यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ जाण्यास बंदी आहे, असे सांगूनही हा तरुण ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
याचदरम्यान पोलिसांची नजर त्याच्या गणवेशावर गेली असता त्याच्या गणवेशावरील मोनोग्राम हा उजव्या बाजूला असल्याचे लक्षात आले. सैन्याच्या गणवेशावरील मोनोग्राम हा डाव्या बाजूला असतो. पोलिसांना संशय आल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेऊन अधिक चौकशी केली असता, त्या व्यक्तीने परिधान केलेला गणवेश बनावट असल्याचे उघडकीस आले. अटक केलेली व्यक्ती ही मुळची हैदराबादची असून त्या व्यक्तीचा सैन्य दलाशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले.
हे ही वाचा:
तुम्ही रडू नका, देश तुमच्या पाठीशी आहे!
इस्रोकडून नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण
रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.
हिंदुत्वाबद्दल मनसे नेते नांदगावकर म्हणाले…
अटक केलेल्या तरुणाचे वडील तेलंगणा येथे राहायला असून मुलाने सैन्य दलात जावे, अशी त्यांची इच्छा होती. सैन्य दलात भरती होऊन सध्या मुंबईत नेमणूक झाल्याचे खोटे त्याने आपल्या वडिलांना सांगितले. त्यासाठीच सैन्याच्या गणवेशातील गेट वे ऑफ इंडिया समोरील छायाचित्र वडिलांना त्याला दाखवायचे होते. मात्र सैन्याच्या सैन्याच्या गणवेशावरील मोनोग्रामच्या चुकीच्या जागेमुळे त्याची लबाडी उघड झाली.