लहान मुलांची चोरी करून परराज्यात त्यांची लाखो रुपयांना विकणाऱ्या टोळीचा वांद्रे पोलिसांना छडा लावण्यास यश आले आहे.
या टोळीतील ४ सदस्यांना पोलिसानी मुंबई आणि तेलंगणा राज्यातून अटक केली असून चोरलेले १० महिन्यांचे मुल ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीत एका महिलेचा समावेश असून ती मुंबईतील फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांची चोरी करून आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये त्यांची विक्री करीत होती.
फरजाना कुर्बान शेख (३३), परंदाम गुंडेती (५०), नक्का नरसिंहा (३५) आणि विशिरीकापल्या धर्माराव (५०) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील चौघांची नावे आहे. फरजाना आणि परंदाम ह्या दोघी मुंबईतील खार दांडा परिसरात राहण्यास असून इतर दोघे आरोपी हे तेलंगणा राज्यात राहणारे आहेत.
वांद्रे पश्चिम माहीम कॉजवे येथील वाहतूक पोलीस चौकी जवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या एका कुटुंबातील १० महिन्याचा कैफ हा मुलगा १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आईच्या कुशीतून अचानक गायब झाला होता. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला.
परिसरात चौकशी करण्यात आल्यानंतर एक महिला मागील काही दिवसापासून एका १३ वर्षाच्या मुलासह जेवण घेऊन यायची व चोरीला गेलेल्या मुलाच्या कुटुंबाला तसेच इतर बेगर्सला देत होती. ह्या माहितीवरून वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे, पोनी. सागर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. हेमंत फड, महेश कदम, एकता पवार यांचे पथक तयार करून या महिलेचा शोध घेण्यात आला, सीसीटीव्ही च्या आधारे या महिलेचा शोध घेऊन खार परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले असता तिने मुलं चोरल्याची कबुली दिली. ही मुलं दीड लाख रुपयांना परंदाम या महिलेला विकले असल्याची कबुली दिली.
हे ही वाचा:
जितेंद्र आव्हाडांच्या ‘कथित’ ऑडियो क्लिपमुळे ‘साहेबांचे’ महिला धोरण पुन्हा चर्चेत
अफगाणिस्तानमध्ये असे असेल नवे सरकार
डॉलरमध्ये ‘गुंतवून’ बहिणीनेच बहिणीला गंडवले
नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय दोन महिने आधीच
पोलिसांनी परंदाम या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता ती मुलं तेलंगणा येथील नातलगाला दीड लाखात विकल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने वेळ न दडवता तेलंगणा गाठून इतर दोन आरोपीना अटक करून त्याच्या ताब्यात असणाऱ्या कैफ या १० महिन्यांच्या मुलाची सुटका केली आहे. ही टोळी मुंबईतील फुथापाथवर राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांची चोरी करून त्यांची इतर राज्यामध्ये विक्री करीत असल्याची समजते. या टोळीने आतापर्यंत किती मुलाची विक्री केली आणि या मुलांचे पुढे काय होते याचा कसून तपास सुरू आहे.