गुन्हेगारांचा सिनेमास्टाइल पाठलाग करत धुळे पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर सकाळी एका भरधाव जाणाऱ्या गाडीला रोखले तेव्हा त्या गाडीतला मुद्देमाल पाहून पोलिसांचे डोळेही विस्फारले.
पोलिसांनी एका वाहनासह ८९ तलवारी व खंजीर जप्त केला आहे. या तलवारी नेमक्या कशासाठी नेल्या जात होत्या, त्यामागे कोण आहे, याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी जालना येथून चार जणांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीर पोलिस ठाण्याचे गस्ती पथक बुधवारी लक्ष ठेवून होते. वाघाडी फाट्याजवळ ते उभे असताना शिरपूरहूर धुळ्याच्या दिशेने जाणारी भरधाव स्कॉर्पिओ दिसल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी स्कॉर्पिओचा पाठलाग केला. एमएच ०९ सीएम ००१५ असा या गाडीचा नंबर आहे. ही गाडी थांबविण्याचा इशारा पोलिसांनी दिला पण त्यांनी गाडी थांबविली नाही. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला. शेवटी सोनगीर फाट्याजवळ स्कॉर्पिओला ओव्हरटेक करून पोलिसांनी ती गाडी थांबविली. त्यात चौघे जण बसलेले होते. त्यांची विचारपूस केल्यावर त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तरे मिळू शकली नाहीत. संशय बळावल्याने पोलिसांनी गाडीची तपासणी केली तेव्हा त्यात ८९ तलवारी व खंजीर आढळला. हा सगळा मुद्देमाल १३ हजार ६०० किमतीचा होता.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट
आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित
नेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर
केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ
या प्रकरणी मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियाज शेख, सय्यद नईम, सय्यद रहीम, कपिल दाभाडे यांना अटक करण्यात आली आहे. सोनगीर पोलिस ठाण्यात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, शामराव अहिरे, इश्वर सोनवणे व सूरज साळवे यांनी या कारवाईत भाग घेतला.