कोविड काळात लोकांची फसवणूक करून खोटं लसीकरण करण्यात आल्याच्या काही घटना मुंबईत घडल्या होत्या. त्यापैकी बोरिवली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या घटनेचा तपास करताना पोलिसांसमोर काही सामान्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. तक्रारदारांनी महेंद्र सिंग आणि इतर जेव्हा त्यांच्याकडे या लसीकरण कँपच्या संदर्भात आले, त्यावेळेस त्यांची सत्यता पडताळून का घेतली नाही, असा प्रश्न पोलिसांना भेडसावत आहे.
पोलिस अधीकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी आरोपींचा प्रस्ताव मान्य केला अशांच्या शोधात आहेत. ज्यांनी लसीकरण मोहिम आखली त्यांनी आरोपींचे कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयासोबत असलेल्या संबंधांची पडताळणी का केली नाही किंवा, आधीच उघडलेल्या लस मात्रांच्या संदर्भात देखील प्रश्न का उपस्थित केले नाहीत, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी लस देताना आरोपींनी सोसायटीमधील सीसीटीव्ही बंद करायला लावले, किंवा सरकारी नियमाचे कारण पुढे करून लसीकरण चालू असताना फोटो काढायला देखील मना केले, त्यावेळी तरी आयोजनकर्त्यांना शंका का आली नाही, असा प्रश्न देखील पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. आरोपींनी तर लस घेणाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी देखील केली नव्हती. या अतिशय सामान्य गोष्टी असून देखील त्या आयोजनकर्त्यांच्या देखील ध्यानात आल्या नव्हत्या.
हे ही वाचा:
ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा
भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे
नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका
प्रदीप शर्मासह दोघांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी सांगितल्यानुसार या गोष्टी आयोजनकर्त्यांच्या ध्यानात यायला हवा होत्या. याकडे झालेले दुर्लक्ष एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकले असते.
बोरिवली पोलिसांनी आदित्य कॉलेज आणि शिंपोली येथील एक शेअर ब्रोकर यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याआधारे मोहिमकर्त्यांची ओळख पटवण्यात त्यांनी कोणता हलगर्जीपणा तर नाही ना केला हे शोधण्याचा प्रयत्न केला.
डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले की, हा तपासकार्यातील नेहमीचा टप्पा आहे आणि तपास योग्य दिशेत चालू आहे. पोलिस आता या गुन्ह्यामागील टोळीच्या कार्यपद्धतीचा तपास करत असल्याची माहिती देखील हाती आली आहे. यासंदर्भात डॉ मनिष त्रिपाठी यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामिन याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
हिरानंदानीमधील नागरिकांना लसीकरणानंतर वेगळ्याच रुग्णालयाचे प्रमाणपत्र मिळाले. त्याबरोबरच काहींनी कोविनवर आपली लसीकरणाची स्थिती तपासल्यानंतर त्यांना पहिला डोस मिळायचा बाकी असल्याचे दाखवले गेले. त्यामुळे हा बनावट प्रकार उघडकीस आला. हिरानंदानीसोबतच वर्सोवा, बोरिवली आणि खार येथून अशा तऱ्हेचे सहा प्रकार उघडकीस आले आहेत.