दसरा मेळाव्यासाठी पोलिस लागले कामाला

दसरा मेळाव्यासाठी पोलिस लागले कामाला

मुंबईत एकाच दिवशी होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यामुळे मुंबई पोलिसांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. या मेळाव्याच्या दरम्यान, मुंबईत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस कामाला लागले आहेत. या दसऱ्या मेळाव्यासाठी इतर जिल्ह्यातून अधिक पोलीस कुमक आणि राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्या मागविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.

शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे अशी दोन गट तयार झालेले आहेत. शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले असून या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेनेच्या चिन्हावरून वाद सुरू असून हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा काही दिवसांवर येऊन ठेपला असून दोन्ही गटांकडून दसरा मेळावा भरविण्यात येणार असून शिंदे गटाने वांद्रे – कुर्ला संकुल येथील ‘एमएमआरडीए’ मैदान दसरा मेळाव्यासाठी घेतलेले असून ठाकरे गटाला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर दादर शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला वाट मोकळी झाली आहे.

मागील आठवड्यात दादर येथे शिंदे आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यानंतर मुंबई पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेला घेऊन प्रश्न निर्माण केल्यामुळे मुंबई महानगर पालिकेने ठाकरे गटाला शिवाजी मैदान येथे मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली होती. परंतु न्यायालयाच्या ठाकरे गटाला दिलासा देत शिवाजी पार्क मैदान ठाकरे गटासाठी मोकळे करून दिल्यामुळे मुंबईत एकाच दिवशी दोन दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्या दरम्यान मुंबईत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तयारी सुरू केली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे, शिंदे समर्थक धारावीत भिडले, तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून शिवाजी पार्क या ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात येनार असल्याचे समजते.यासाठी मुंबई पोलिसांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे मुंबईत पोलिसांची अधिक कुमक मागविण्या साठी निवेदन दिले जाणार असल्याचे कळते. मुंबईत राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्या, रॅपिड ऍक्शन फोर्स (शीघ्रकृती दल) आणि इतर जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस फोर्स मागवली जाणार आहे.

एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Exit mobile version