मुंबईतील एका बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट उधळून लावत मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरी येथून पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. हे पाच जण बिष्णोई टोळीचे सदस्य असल्याचा संशय गुन्हे शाखेने व्यक्त केला असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.
विकास दिनेश ठाकूर उर्फ विकी (२४) रा.हुमायूनपूर, गोरखपूर (उत्तर प्रदेश), सुमित कुमार दिलावर (२६)रा. सोनीपत (हरियाणा),देवेंद्र सक्सेना (२४) इंदोर (मध्य प्रदेश), श्रेयस यादव (२७) गोपालगंज (बिहार) आणि विवेक कुमार गुप्ता (२२) अलवर (राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या पाच जणांकडून ७ देशी बनावटीचे पिस्तुल,२१ राऊंड(काडतुसे) आणि दोन मोबाईल सिम कार्ड जप्त करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला, सलमान खानला येत असलेल्या धमक्या तसेच राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई टोळीने संपूर्ण मुंबईवर दहशत निर्माण केली आहे.या टोळीकडून देशातील बडे उद्योगपती, बॉलिवूड स्टार यांना लक्ष्य केले जात आहे. मुंबई गुन्हे शाखेने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी बिष्णोई टोळीच्या २५ पेक्षा अधिक सदस्यांना अटक केली आहे.मात्र या अटकेनंतर देखील बिष्णोई टोळीने मुंबईवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याची माहिती सूत्राकडून समजते.
हे ही वाचा:
ममतांबद्दल दया माया नाही; शिक्षक भरती प्रक्रिया रद्दच, ‘सर्वोच्च’ शिक्कामोर्तब!
ट्रम्प यांच्याकडून भारतासह १८५ देशांवर परस्पर शुल्काची घोषणा; कोणता देश किती भरणार कर?
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव मध्यरात्री लोकसभेत मंजूर
बिश्नोई टोळीशी संबंधित पाच जणांना अंधेरीतून ठोकल्या बेड्या
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून रमाजन ईदच्या दोन दिवसांपूर्वी अंधेरी येथील एका हॉटेलमधून पाच जणांना शस्त्रासह अटक केली, या पाच ही जणांचे बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. या पाचही जणांना अटक करून त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत ही टोळी मुंबईतील एका बड्या उद्योगपतीच्या हत्येसाठी मुंबईत दाखल झाली होती, या टोळीने ईदच्या दिवशीच हे काम करून पळून जाण्याची योजना आखली होती.मात्र या टोळीच्या निशाण्यावर असणाऱ्या बड्या उद्योगपतीचे नाव अद्याप उघडकीस करण्यात आलेले नाही.या प्रकरणाचा तपास सुरू असून या टोळीचे काही सदस्य अद्यापही मुंबईत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.