सलमान खानच्या निवासस्थानावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरानी वापरलेले पिस्तुल मुंबई गुन्हे शाखेने गुजरात राज्यातील तापी नदीच्या पात्रातून हस्तगत केले आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी सुरत येथील तापी नदीच्या पात्रात राबवलेल्या शोध मोहिमेत पोहणाऱ्याच्या मदतीने एक पिस्तुल आणि एक काडतुस हस्तगत केले आहे. दुसऱ्या पिस्तुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात येत होता.
सलमान खानच्या वांद्र्यातील ‘ गॅलक्सि आपर्टमेंट’ या निवासस्थानावर मागील आठवड्यात रविवारी पहाटे मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार करून पळ काढला होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या या हल्लेखोराना मुंबई गुन्हे शाखेने ३६ तासांतच गुजरात राज्यातील भुज येथून अटक केली होती, परंतु हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तुल पोलिसांना सापडले नव्हते.
हे ही वाचा:
तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्या रेगेला माहीममधून अटक
वसुंधरा दिनानिमित्त ‘फॉर फ्युचर इंडिया’ चे कांदळवन स्वच्छता अभियान!
इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा
देशाच्या कर उत्पन्नात १७.७ टक्क्यांनी वाढ
हल्लेखोर विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोघांनी हल्ल्यानंतर थेट सुरत गाठले होते, त्या ठिकाणी तापी नदीच्या पात्रात गुन्ह्यातील पुरावा असलेले दोन पिस्तुल आणि काडतुसे फेकून भुजला पळ काढला होता. गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल हा महत्वाचा पुरावा असल्यामुळे मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक पथकासह आरोपीना घेऊन सोमवारी सकाळी सुरत येथे रवाना झाले होते.
सोमवारी दुपारी गुन्हयात वापरलेल्या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी पोहणाऱ्यांना नदीच्या पात्रात उतरविण्यात आले.सायंकाळी उशिरापर्यंत पिस्तुलचा शोध घेत असताना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोहणाऱ्यांना नदीच्या पात्रात एक पिस्तुल आणि एक काडतुस मिळून आले आहे, काळोख पडल्यामुळे ही शोध मोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी पुन्हा सकाळी दुसरे पिस्तुल शोधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.