पश्चिम बंगालमधील हुगळीत सोमवारी(६ मे) एक मोठी दुर्घटना घडली.हुगळीच्या पांडुआ येथे एक स्फोट झाला असून या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.तर अन्य तीन मुले जखमी झाले आहेत.काही मुले खेळत असताना बॉल म्हणून बॉम्ब उचलण्यात आला आणि त्याचा स्फोट झाला, असे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लहान मुले खेळत असताना चेंडू समजून बॉम्ब उचलला आणि त्यानंतर तो फुटला.या दुर्घटनेनंतर जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी एका मुलाला मृत घोषित केले.राज विश्वास (११) असे मृत लहान मुलाचे नाव आहे.तसेच या स्फोटात एका मुलाला आपला हात गमवावा लागला. पांडुआ विभाग हुगळी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.लोकसभेसाठी या जागेवरून भाजपचे उमेदवार लॉकेट चॅटर्जी उभे राहिले आहेत.घटनेची माहिती मिळताच लॉकेट चॅटर्जी यांना घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’
इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!
‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’
लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पांडुआच्या तिन्ना नेताजीपल्ली कॉलनीत तलावाच्या काठावर अनेक मुले खेळत होती. अचानक स्थानिक लोकांना स्फोटाचा आवाज आला. तिथे जाऊन पाहिलं तर अनेक मुलांना बॉम्बचा फटका बसला होता. यानंतर लोकांनी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रुपम वल्लभ आणि सौरभ चौधरी अशी जखमींची नावे आहेत.
दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही दाखल झाला आहे. या ठिकाणी बॉम्ब कोणी ठेवला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.हुगळीत हा बॉम्बस्फोट अशा वेळी झाला जेव्हा येथे काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. हुगळीच्या जागेवर पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.