बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक म्हणजेचं एसआयटीची स्थापना केली आहे. दरम्यान, एसआयटीमधील अधिकाऱ्यांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या अधिकाऱ्यांमुळे प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार नाही, असा आरोप केला जात असतानाचं आता एसआयटीमधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. तर, वाल्मिक कराड हा या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. ३१ डिसेंबर रोजी सीआयडीसमोर शरण आल्यानंतर त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. यानंतर राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीमधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पोलीस अधिकारी आणि आरोपीचा एकत्र फोटो समोर आल्यानंतर यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला. प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होणार नाही, असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला आहे. त्यामुळे एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला एसआयटीमधून हटवण्यात आलं आहे. या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.
हे ही वाचा..
छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक
कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?
केजरीवाल यांचा ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करा!
बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत
राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसेच सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने या प्रकरणाच्या तपासासाठी काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीची समिती स्थापन केली. या समितीत १० पोलीस अधिकारी आहेत. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.