मुंबईत ड्रग्स माफियांनी दहशत निर्माण केली आहे, या ड्रग्स माफीयांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्याला जगातून उठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील पश्चिम उपनगरात घडला आहे.
ड्रग्सच्या विरोधात आवाज उठवला म्हणून काही जणांनी घरात घुसून संपूर्ण कुटूंबावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री वांद्रे पश्चिम येथील दर्गा गल्लीत घडली आहे.
या हल्ल्यात ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून कुटूंबातील दोन सदस्य जखमी झाले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या वांद्रे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले चौघे ड्रग्स तस्करी करीत असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटूंबाने केला आहे. या घटनेचा आणि ड्रग्सचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकीर अली असे मृताचे नाव आहे. त्याच्या घरात जबरदस्तीने घुसून त्याच्यावर कुटूंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात मृत शकिर अली याची मेव्हणी शिरीन आणि पुतण्या अफजल यांनाही दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शकीरचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्याला घातले कंठस्नान
राणाची इच्छा होती, २६/११ च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा!
शेख हसिनांसह मुलगी आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी!
मग तुम्ही आमदार असून उपयोग काय ?
अटक केलेल्या आरोपींमध्ये ड्रग्ज तस्करांचा समावेश आहे.
या प्रकरणात पोलिसांनी इम्रान पठाण, त्याची पत्नी फातिमा झाकीर अली (कायनात म्हणूनही ओळखले जाते), उस्मान झाकीर अली आणि झाकीर अली सेंडोले या चार जणांना अटक केली आहे.
आरोपीचा वांद्रे परिसरात ड्रग्ज विक्री आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप मृत शकिर अलीच्या कुटूंबानी केला आहे. इम्रान पठाण आणि त्याची पत्नी हे ड्रग्ज पुरवठादार होते आणि त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याशी संबंधित इतरांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी मात्र या घटनेशी ड्रग्सचा काहीही संबंध नसून संपत्तीच्या वादातून या दोन्ही कुटूंबात वाद होते आणि या वादातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.