मोबाईल रिपेअरिंग साठी ५०० रुपयांसाठी तगादा लावणाऱ्या २५ वर्षाच्या तरुणाची दोन जणांनी भोसकून हत्या केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली असून अटक करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाजिम इफ्तेकार खान (२५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा (२१) आणि शानु चांद मोहम्मद खान (२२)असे अटक करण्यात आलेल्या दोघा भावाची नावे आहेत.
मृत नाजीम आणि आरोपी हे गरीब नगर,वांद्रे पूर्व येथे राहण्यास आहे. काही दिवसांपूर्वी शादाब उर्फ भुरा याच्याकडून नाजीमचा मोबाईल फोन पडून त्याची स्क्रीन खराब झाली होती. मोबाईल रिपेअरिंगसाठी एक हजार रुपये खर्च झाला होता, मात्र शादाब याने नाजीमला ५०० रुपये दिले होते, उर्वरित पाचशे रुपयांसाठी नाजीमने शादाब कडे तगादा लावला होता, आजच उर्वरित रक्कम पाहिजे म्हणून नाजीम हा शादाबच्या पत्नीला बोलून गेल्याचा राग आल्याने गुरुवारी नाजीम आणि शादाब मध्ये भांडण झाले. या भांडणात शादाब आणि भाऊ शानु या दोघांनी नाजीमला मारहाण करून कमरेला असलेल्या चाकूने नाजीमची भोसकून हत्या केली.
हे ही वाचा:
प्रणिती शिंदे रोहित पवारांना ओळखेनाशा झाल्या
राहुल-राऊत खुळे कि काय? पवार अदाणींचे सांगाती…
मी दाऊदी बोहरा समाजाचाच एक सदस्य…नरेंद्र मोदी
सोन्याचा दात चमकला आणि आरोपी सापडला!
या घटनेची माहिती मिळताच निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत पाटील पोलीस हवालदार शेख पोलीस नाईक सोनवणे, पोलीस हवलदार पवार पोलीस नाईक वाघमारे व पोलीस शिपाई कोयंडे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना एका तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा नमूद गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला म्हणून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.