फेसबुकवर सर्फिंग करताना शेअर्समध्ये गुंतवणूकीबाबत दिसलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेऊन गुंतवणूक करणे एका व्यवसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. ठगांनी या व्यावसायिकाला नऊ लाख ४७ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एम. एच. बी. कॉलनी पोलीस तपास करत आहेत.
बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनीमध्ये कुटुंबासोबत राहात असलेल्या ५१ वर्षीय तक्रारदार यांचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. गेल्यावर्षी ५ डिसेंबरला फेसबुकवर सर्फिंग करत असताना त्यांना गोल्डमेन सैक्स यांची एक स्टॉक इंन्वेस्टमेंट बिझनेस स्कुल स्टुडन्ट अशी जाहिरात दिसली. तक्रारदार यांनी येथे जॉईन होण्यासाठी देण्यात आलेल्या बॉक्सवर क्लिक करून त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंचा नारा म्हणजे, ‘मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी’
“फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्यात”
वायनाडमध्ये कॉलेजवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या; डाव्या चळवळीतील संघटनेच्या सहा सदस्यांना अटक
“संजय राऊतांनी रोखल्यामुळेच उद्धव ठाकरे २०२१ मध्ये भाजपासोबत गेले नाहीत”
जय सहानी नावाचा व्यक्ती ग्रुपचा प्रमुख होता. ग्रुपला जॉईन झाल्यापासुन तक्रारदार हे ग्रुपवरील पोस्ट बघत होते. ग्रुपवरील स्टॉक स्टीप्स बघून तक्रारदार यांनी स्वतःचे डिमॅट खाते उघडून काही शेअर्स खरेदी आणि विक्री केले. त्यातून त्यांना १२ हजार रुपयांचा फायदा झाला. १० डिसेंबरला व्हॉट्सअप ग्रुपवरील असिस्टंट देविका हिने तक्रारदार यांना संपर्क करुन काही प्रश्न किंवा अडचणी असतील संपर्क साधण्यास सांगितले.
काही दिवसांनी तिने तक्रारदार यांना एक खाते सुरु करुन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तक्रारदार यांनी एकूण नऊ लाख ४७ हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना १९ लाख ९७ हजार रुपयांचे शेअर्स खरेदी करण्यास सांगण्यात आले. हे शेअर्स खरेदी केल्यानंतर गुंतवलेली संपूर्ण रक्कम काढता येईल असे सांगण्यात आल्याने तक्रारदार यांना संशय आला. त्यांनी गुंतवलेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना रक्कम परत मिळाली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने तक्रारदार यांनी एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दिली आहे.