दारु प्यायल्यानंतर पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने एका मासे विक्रेत्याने धारदार शस्त्राने वार करुन मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन टिळकनगर पोलीसांनी आरोपी रोहीत दिपक खर्पे (२९) याला बेड्या ठोकल्या आहेत.
चेंबूरच्या टी. वाय. थोरात मार्गावरील तंबी ब्रिजखाली एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती शुक्रवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेची वर्दी मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल पूर्व मृत घोषित केले.
हे ही वाचा:
टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव
रिकाम्या खुर्च्यांमुळे बिथरले ठाकरे-पवार
अश्विनची १०० नंबरी चमक, भारताने इंग्लंडला गारद करत मालिका जिंकली
‘सिक्सर किंग’ रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी
घटनेची नोंद करुन टिळकनगर पोलिसांनी तपास सुरू केला. मृत तरूण हा नवी मुंबईतील सानपाडा परिसरात राहात असलेला भिमसेन देवचंद भालेराव (३५) असल्याचे उघड झाले. भालेराव हा गुरुवारी रात्री चेंबूरमध्ये आला होता. तो खर्पेसोबत दारु प्यायला बसला. यावेळी त्याने खर्पेच्या पत्नीबद्दल अपशब्द काढले. यामुळे खर्पे याने रागाच्या भरात धारदार शस्त्राने भालेराववर सपासप वार करुन पळ काढल्याचे पोलीस तपासात समोर आले.
अखेर, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी खर्पेचा शोध सुरू केला. आरोपीच्या अटकेसाठी सहा पोलीस पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी खर्पे याला ताब्यात घेत अटक केली आहे.