घटस्फोट देणाऱ्या पत्नीवर पतीने ऍसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना वांद्रे पूर्व येथे सोमवारी घडली आहे. या ऍसिड हल्ल्यात पत्नी आणि १२ वर्षाचा मुलगा भाजला असून दोघाना कस्तुरबा रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मल नगर पोलिसांनी पती विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, जखमी झालेली आरोपीची दुसरी पत्नी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे (पूर्व) येथील बेहरामपाडा येथे राहणारा आरोपी इशरत शेख (४० ) हा ऑटोरिक्षा चालक आहे. इशरत शेख याला पहिल्या पत्नीपासून बारा वर्षाचा मुलगा असून सहा वर्षांपूर्वी इशरत याचे अंजुम सोबत लग्न झाले होते. अंजुम केटरिंगचे काम करते, मागील दोन वर्षांपासून इशरत आणि अंजुम यांच्यात काही मुद्द्यावरून भांडण सुरू होते,अंजुम ने वांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली होती. पाच दिवसांपूर्वी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निकाल दिला होता. मात्र इशरतला तिच्यापासून घटस्फोट नको असल्याने तो नाखूश होता असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
करदात्यांना दिलासा, शेअर मार्केटला झटका
विनातिकिट प्रवाशाला टीसीच्या घोळक्याकडून बेदम मारहाण
बजेट २०२४; देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्याच्या संकल्पाचे प्रतिबिंब !
बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित
सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास अंजुम ही दारात सावत्र मुलासह बसलेली होती, त्यावेळी इशरतचा हा हातात एक डब्बा घेऊन अंजुमकडे आला व त्याने रागाने तीला म्हणाला की, “जर तू माझी होऊ शकत नाही ,तर तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही, असे बोलून त्याने सोबत आणलेल्या ऍसिडचा डब्बा अंजुमच्या अंगावर ओतला, या ऍसिड हल्ल्यात अंजुम आणि बारा वर्षाचा मुलगा हे दोघे जखमी झाले,या ऍसिड हल्ल्यानंतर इशरत याने घटनास्थळावरून पळ काढला.
त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले आणि त्यांनी त्यांना भाभा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती आणि भाजलेली जखम पाहता दोघांनाही चिंचपोकळी, सात रस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. आता दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. “आम्ही इशरतविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात त्याला शोधून अटक करण्यात आली आहे. तिला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, आहे अशी माहिती निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वपोनि.श्रीमंत” शिंदे यांनी दिली.