केईएमच्या आवारातच कौटुंबिक वादातून एकाला भोसकले

केईएमच्या आवारातच कौटुंबिक वादातून एकाला भोसकले

पत्नीच्या प्रियकराला रुग्णालयाच्या आवारातच भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री परळच्या केईएम रुग्णालयात घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसानी एकावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हल्लेखोराला अटक केली आहे. या घटनेमुळे केईएम रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

संतोष भांबले (४५) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असून राजेंद्र शेट्टी हा आरोपी आहे. हे दोघे सांताक्रूझ येथे शेजारी राहतात. राजेंद्र शेट्टी याची पत्नी आरती शेट्टी हिचे लॉकडाऊनच्या दरम्यान संतोष भांबले सोबत प्रेमसंबंध जुळले होते. याची खबर शेट्टीला लागल्यामुळे त्याने पत्नीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेट्टीने संतोष भांबले याला देखील माझ्या बायकोचा नाद सोड असे सांगितले असताना देखील दोघांचे प्रेमप्रकरण सुरूच होते.

दोन दिवसांपूर्वी राजेंद्र शेट्टी याची पत्नी दोन्ही मुलांना टाकून घर सोडून गेली होती. राजेंद्र शेट्टी हा पत्नीचा शोध घेत असताना ती संतोष भांबले याची आई केईएम रुग्णालयात दाखल असून पत्नी आरती रुग्णालयात असल्याचे राजेंद्र शेट्टी याला कळले. मंगळवारी रात्री त्याने थेट केईएम रुग्णालय गाठले.

हे ही वाचा:

‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’

विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर

सचिन वाझे म्हणतो, मला अनिल देशमुखांनीच वसुलीचे आदेश दिले!

ठाकरे सरकार विरोधात अण्णा हजारेंचे बेमुदत उपोषण

 

केईएमच्या नवीन इमारती समोर राजेंद्र शेट्टी आणि संतोष भांबले हे समोरासमोर आले व दोघांत शाब्दिक वाद झाला. या वादातून राजेंद्र शेट्टी याने संतोष भांबलेच्या पोटात, छातीत धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात संतोष हा एक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या भोईवाडा पोलिसानी राजेंद्र शेट्टी याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Exit mobile version