गिरगावातील सोने व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या आरोपीला गजाआड करत वि.प. मार्ग पोलिसांनी तब्बल दोन कोटी ४० लाख रुपये किंमतीचे तीन किलो सोने जप्त केले आहेत. चंद्रभान राममनोहर पटेल (३६) असे अटक आरोपीचे नाव असून पोलीस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
गिरगावमधील सोने व्यावसायिक किशोरमल चौहान (६५) यांच्या कार्यालयात १७ डिसेंबरच्या रात्री घुसलेल्या चोरांनी तीन किलो वजनाची तीन सोन्याची बिस्किटे आणि टेबलच्या ड्रॉव्हरमधील २५ हजार रुपयांच्या रोख रकमेवर हातसाफ केला होता. चौहान यांनी दिलेल्या तक्रारीवरून वि. प. मार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.
हे ही वाचा:
आमच्याकडे ‘मानापमान’ मनात होतो, त्याचं ‘संगीत’ मीडियात वाजतं!
गिरगावात डोळ्यात मिरची पूड टाकून १० लाख लुटणारा अटकेत
अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ल्यातील आरोपींना जामीन, रेवंत रेड्डींशी संबंध!
घराचे नाव ‘रामायण’ अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल!
पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे राजस्थानमधील जयपूर आणि मुंबईत तपास करुन गिरगावमधील सी.पी. टॅंक परिसरातून आरोपी चंद्रभान पटेल याला ताब्यात घेत अटक केली. मूळचा उत्तरप्रदेशमधील जौनपूर, मडियाहू बुध्दिपूरचा रहिवासी असलेला पटेल हा कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. पोलिसांनी त्याच्याजवळून गुन्ह्यातील दोन कोटी ४० लाख रुपये किंमतीची चोरीची तीन किलो वजनाची सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत.