प्रफुल पटेल यांचा फोटो वापरून कतारच्या राजकुमारकडे पैशाची मागणी

पैशाच्या तंगीमुळे केले कृत्य

प्रफुल पटेल यांचा फोटो वापरून कतारच्या राजकुमारकडे पैशाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचा प्रोफाइल फोटो व्हाट्सअपला  वापरून कतारच्या राजकुमारकडे पैशांची मागणी करणाऱ्याला महाराष्ट्र सायबर सेलच्या नोडल सायबर पोलिसांनी जुहू येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली आहे.

राहुल कांत असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून राहुलचा हॉटेल व्यवसाय होता. याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाण्यात कलम ६६ (८) माहिती ज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

राहुल कांत हा कतार मधील राज घराण्यातील लोकांची फसवणूक करण्याच्या तयारीत होता. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून तक्रार येताच महाराष्ट्र सायबरने चौकशी आणि तपास सुरु केला. दरम्यान जुहू येथून राहुल कांत याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० जुलै रोजी महाराष्ट्र सायबर विभागाकडे अज्ञात व्हॉट्सअप अकांउट धारकविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

या गुन्ह्यातील तक्रारदार विवेक अग्निहोत्री यांनी समक्ष नोडल सायबर पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद दिली. २० जुलै रोजी फिर्यादी यांना त्यांच्या कार्यकर्त्याकडून कळाले की, अज्ञात मोबाईल कमांक धारकाने प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व त्यांचे नाव वापरून व्हॉट्सअप सोशल मिडीयावर तो स्वतः प्रफुल पटेल, राज्यसभा सदस्य असल्याचे भासवत असल्याचे व त्याचा चुकीचा वापर करत असल्याचे कळाले. त्यानंतर फिर्यादी यांनी प्रफुल्ल पटेल यांना ही माहिती सांगितली.

हे ही वाचा:

दिब्रिटोनी युरोप अमेरिकेत जन्म घ्यावा!

शहापूरला पर्यटनाचा तालुका म्हणून घोषित करा

ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे लाईन्सवर हल्ला

म्यानमारमध्ये गृहयुद्ध; चीन सीमेला लागून असलेल्या लॅशियो शहरावर बंडखोरांकडून कब्जा

फिर्यादी यांनी अज्ञात मोबाईल धारकाचा मोबाईल कमांक ट्रू कॉलर या एपवर तपासला असता त्या मोबाईल क्रमांकाचे डिस्प्ले प्रोफाईल प्रफुल पटेल असे नाव दिसून आले. त्यानंतर त्या क्रमांक व्हॉट्सअपवर चेक केला असता त्याचे डिस्प्ले प्रोफाईल प्रफुल पटेल असे नाव आणि प्रफुल पटेल यांचा फोटो दिसुन आला. त्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ त्याचे स्किन शॉट काढले. त्यामुळे त्यांची खात्री झाली की अज्ञात मोबाईल क्रमांकधारक याने प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा व फोटोचा वापर करून खोटे व्हॉट्सअप अकांऊट तयार केले आहे.

या अनुषंगाने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे जोरदार फिरवली आणि राहुल कांत याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत राहुलने पोलीसांना सांगितले की, त्याचे हॉटेल व्यवसायात नुकसान झाले होते, त्यात आईला गंभीर आजार झाल्यामुळे त्याला पैशांची गरज होती, त्यासाठी त्याने हे कृत्य केले.

Exit mobile version