पुण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडल्याच्या घटनेमुळे सध्या राज्यात चांगलेच संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी गाडी चालवणारा वेदांत तसेच प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा न्यायालय परिसरात लोकांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.
कल्याणीनगर अपघातप्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला बुधवार, २२ मे रोजी पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलं. मात्र, न्यायालय परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला. विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला. वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचललं. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात रात्रीच्या वेळी हा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी पोर्शे गाडी ताशी २०० किलोमीटर वेगाने जात होती. आरोपी अल्पवयीन होता शिवाय त्याच्याकडे लायसन्स नव्हते, त्याने गाडी चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले नव्हते. गाडीचीही नोंदणी झालेली नव्हती. चालकाचे वडील विशाल हे ब्रह्मा रियल्टी नावाची कंपनी चालवतात. आरोपी अल्पवयीन मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि तो पार्टी करून परतत होता. या अपघातानंतर तेथे उपस्थित लोकांनी आरोपीला बेदम मारहाणही केली. आरोपी वडिलांवर आपल्या अल्पवयीन मुलाला पोर्शे चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू दिली जात होती त्या पबवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि पबवरही अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. अशातच आता या कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.
हे ही वाचा:
‘भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत, उर्वरित दोन टप्प्यांत ४०० ओलांडणार’
पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?
भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!
संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…
संपत्तीच्या वादात वेदांत याच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांवर दबाव निर्माण करण्यात आल्याची देखील चर्चा आहे. या प्रकरणात आरोप पत्र दाखल होईपर्यंत विशाल अग्रवालच्या वडिलांना अटक झाली नव्हती. मोक्का लावणं अपेक्षित असताना देखील आयपीसी सलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती आहे.