संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घ्या, अन्यथा… स्वप्ना पाटकर यांना धमकी

संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घ्या, अन्यथा… स्वप्ना पाटकर यांना धमकी

पत्राचाळ घोटाळ्यात चौकशी सुरू असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधात दिलेला जबाब बदलावा यासाठी जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार पाटकर यांनी केली आहे.

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. १०३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी ईडीचे समन्स म्हणजे कट असल्याचे म्हटले आहे. ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची चौकशी देखील झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब मागे घ्यावा अन्यथा बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. ही धमकी ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने असावेत असे पाटकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणाची तार पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे.चौकशीसाठी बोलावल्यानंतर स्वप्ना पाटकर काही कागदपत्रांसह ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या. यापूर्वी, ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्यांच्या दोन साथीदारांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. काही जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि संजय राऊतचा निकटवर्तीय प्रवीण राऊत याला ईडीने अटक केली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; नागरीक संसदेत घुसले

शिंदे-फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर

धमकी देणाऱ्यांकडून ठेवली जात आहे पाळत

धमकी देणाऱ्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात असून मोबाइलही हिसकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी म्हटले. मागील अनेक दिवसांपासून धमकी मिळत असून मानसिक त्रासही दिला जात असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. माझा मोबाइल क्रमांक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी लिहिला आहे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घरी येणाऱ्या वृत्तपत्रातून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे पाटकर यांनी सांगितले. या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पाटकर यांचीही झाली होती ईडी चौकशी

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांची ईडीने चौकशी केली आहे. स्वप्ना पाटकर सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांनी घटस्फोट घेतला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती.

पत्रचाळ प्रकरण काय?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

Exit mobile version