सोलापूरच्या रुग्णालयातील रुग्णाने व्हीडिओ शेअर करत सांगितली अवस्था
महाराष्ट्रात कोविडने हाहाकार माजवला आहे. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या नावाने असलेली वानवा देखील समोर येत आहेच. सोलापूर येथील नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील गैरप्रकार तिथेच दाखल झालेल्या महेश कदम यांनी एका व्हिडिओद्वारे बाहेर आणला आहे. रुग्णालयात कशी अरेरावीची भाषा वापरली जाते आणि रुग्णांवर जरब बसविली जाते, याची पोलखोलच या रुग्णाने केली आहे.
महेश कदम यांनी या व्हिडिओमध्ये स्वतः पत्रकार असल्याचा आणि एका चॅनेलचा संपादक असल्याचा दावा केला आहे. त्यांना २० एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली, आणि त्यानंतर ते २२ एप्रिल २०२१ रोजी डफरीन चौक, सोलापूर येथील नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. परंतु त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू व्हायला सुमारे ८-१० तासांचा वेळ लागला.
हे ही वाचा:
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार
दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत
या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. या रुग्णालयात सातत्याने पैशांची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती देखील त्यांनी दिली. त्याबरोबरच रुग्णालयाच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये रात्री पाणी नाही, त्याबद्दल तक्रार केली असता मॅनेजर गुंडगिरीची भाषा करत असल्याचे अमानुष प्रकार देखील त्यांनी उघड केले. ‘रहावं वाटलं तर रहा, नाहीतर माझं काय वाकडं करायचंय, या हॉस्पिटलचं काय वाकडं करायचं…..आम्ही तुझ्यासारखे अनेक इंजेक्शन देऊन मारले आहेत’ अशा प्रकारची अरेरावीची भाषा केली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.
यावेळी त्यांनी या रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे उपचार होत नसल्याचे देखील सांगितले. या व्हिडिओ द्वारे त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना या रुग्णालयावर धाड घालण्याची विनंती केली आहे. औषधांचा आणि उपचारांचा काळाबाजार चालला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
रुग्णालयात उपचारही होत नाहीत आणि डिस्चार्जही दिला जात नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता आपणच या रुग्णालयातून बाहेर पडणार असल्याचे आहोत असेही ते म्हणाले, आणि जर रुग्णालयाने सोडलं नाही, तर इथे आत्मदहन देखील करू असा इशारा त्यांनी दिला आहे.