पश्चिम बंगालमधील अटकेत असलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची शिक्षक भरती घोटाळ्या अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून चौकशी सुरू आहे. अहवालानुसार, पार्थ चॅटर्जी यांच्या घरी दर महिन्याला अडीच लाख रुपयांची फळे यायची अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखादी व्यक्ती महिन्याला अडीच लाख रुपयांची फळे कशी खाऊ शकते, या प्रश्नाच्या उत्तराचा ईडीचे अधिकारी शोध घेत आहेत.
ईडीला तपासादरम्यान फळांची बिलं सापडली होती. त्यानुसार पार्थ यांच्या घरी दर महिन्याला अडीच लाखांची फळं यायची म्हणजेच दररोज सुमारे ८ हजार रुपये फक्त फळांवरच खर्च होत होते. याप्रकरणी ईडी भुवनेश्वर येथील डॉक्टरांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. एसएससी शिक्षक भरती घोटाळयाप्रकरणी अटक केल्यानंतर पार्थ यांना याच डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे हे नेते दीर्घकाळापासून टाइप २ मधुमेहाने त्रस्त आहेत. या माहितीमुळे ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे अशा प्रकारच्या मधुमेहाने ग्रस्त असलेली व्यक्ती महिन्याला अडीच लाख रुपयांची फळे खाऊ शकते का?
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर
झाडू मारण्याचे काम करता करता त्या स्टेट बँकेत झाल्या सहाय्यक महाव्यवस्थापक
विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार
पार्थ चॅटर्जी यांच्या सर्व कागदपत्रांच्या तपासणी दरम्यान फळांचे बिल ईडीला दिसले. कोलकात्याच्या न्यू मार्केटमधील अनेक दुकानांमधून पार्थ चॅटर्जी यांच्या घरापर्यंत ही फळे पोहोचवण्यात आल्याचे या बिलांवरून सिद्ध झाले. अशा प्रकारे दरमहा सुमारे अडीच लाखांचे बिल येते. तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तो फळे खरेदी करत असे आणि काळ्या पैशाचे पांढर्या पैशात रूपांतर करत असे, अशी माहिती ईडीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.