पुण्यातील एका शाळेत पालकांनी फी बाबत विचारणा केली असता पालकांना मारहाण केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत घडली असून महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पालक मंगेश गायकवाड यांच्याकडून शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
क्लाईन मेमोरियल शाळेत मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा शिक्षण घेतो. मुलाची फी भरण्यासाठी त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी पत्र दिले होते. त्यावर खुलासा देण्यासाठी मंगेश गायकवाड आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणे दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊन्सरला बोलावून मारहाण करायला लावल्याचे मंगेश गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
भाजपा सरकारच्या आणखी एका निर्णयाला मविआकडून स्थगिती
तेजस मोरे यांनी केले स्टिंग ऑपरेशन; प्रवीण चव्हाणांचा आरोप
वेस्ट इंडीजवर भारतीय महिला संघाचा १५५ धावांनी दणदणीत विजय
तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय म्हणाले जो बायडन?
दरम्यान, सोशल मीडियावर या संपूर्ण मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारदार गायकवाड हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप, शाळेकडून या प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.