मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे ५ मे पासून सुट्टीवर गेल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे त्यांनी आपला पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी परमबीर हे सुट्टीवर असल्याने आयपीएस के. व्यंकटेशम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे तब्बल २ महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला परमबीर सिंह हे चंदिगड येथे असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
कॉलेजच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडीओने उडवला गोंधळ
गांजा तस्करी करणारा आरोपी चार महिन्यांनंतर अखेर अटकेत
स्वप्नातल्या घरासाठी सामन्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!
बंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला?
चंदीगडमधील एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते. परमबीर सिंग यांच्यावर अट्रोसिटीसहित विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यांना जरी सध्या अटकेपासून संरक्षण मिळालं असलं तरी येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. देशमुख यांच्याकडून १०० कोटींचे वसुली टार्गेट दिले जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.