फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अखेर परतले आहेत. कांदिवली येथील गुन्हे शाखेत परमबीर दाखल झाले आहेत. गुरुवार, २५ नोव्हेंबर रोजी परमबीर हे अचानकपणे मुंबईत दाखल झाले. गेले अनेक महिने तपास यंत्रणा त्यांच्या शोधात होत्या. त्यामुळे आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकून १०० कोटी वसुलीचे भांडाफोड करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले होते. गेले अनेक महिने विविध तपास यंत्रणा त्यांच्या मागावर होत्या. कोर्टाकडून वारंवार त्यांना समन्स पाठवण्यात आले असतानाही ते हजर राहत नव्हते.
हे ही वाचा:
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ
परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती
बुधवार, २४ नोव्हेंबर रोजी परमबीर हे चंदीगड मध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचे म्हटले होते. पण ते चंदीगडमध्ये असून लवकरच ते पुढील चौकशीसाठी मुंबईत येऊ शकतील अशी माहिती पुढे आली होती. त्यानुसार गुरुवार, २५ नोव्हेंबर रोजी परमबीर हे मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती पुढे आली. तब्बल २३१ दिवसांनी परमबीर हे समोर आले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयने परमबीर सिंग यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.