महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांचा वसुलीचा आराखडाच स्पष्ट झाला आहे. देशमुखांचे स्विय सहाय्यक संजीव पालांडें आणि कुंदन शिंदे यांनी बदल्यांसाठी आणि बार मालकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही १ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या दोघांची आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक न्यायालयासमोर सुनावणी सुरू असताना हे वास्तव समोर आले आहे.
ईडीने देशमुख यांच्या घरांवर शुक्रवारी धाडी घातल्यानंतर या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ताब्यात घेतले आणि आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक न्यायालयासमोर उभे केले. ज्या बार मालकांकडून पैसे उकळण्यात आले, त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर त्यांनी हे पैसे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला दिल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री महाराष्ट्राला ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहातायत!
देवेंद्र फडणवीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात
तिसरी लाट तोंडावर; पण ठाकरे सरकार गाफील
ओबीसींचे राजकीय आरक्षण जाणे हे षडयंत्र
सचिन वाझेचाही ईडीने तुरुंगात जबाब नोंदवला आहे. त्याने गुन्ह्यांची कबूली देत. हे पैसे कुंदन यांना दिल्याचे सांगितले. सचिन वाझे हा त्या वेळी मुंबई पोलिस दलातील सीआययू विभागाचा अधिकारी होता. वाझेने झोन १ ते ७ मधून जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान १ कोटी ६४ लाख जमा करून घेतले. तर वाझेने झोन ८ ते १२ मधून २ कोटी ६६ लाख जानेवारी फेब्रुवारी दरम्यान घेऊन दिले. हे पैसे रात्री १२ नंतर बार सुरू ठेवण्यासाठी व आर्केस्ट्रा बारमध्ये नियमांपेक्षा जास्त नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी म्हणून देण्यात आले.
देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे नागपुरात साई संस्था ट्रस्ट नावाची संस्था आहे. कुंदन हे देखील त्या संस्थेच्या समितीवर आहेत. तसेच दिल्लीसह इतर ठिकाणच्या कंपनीवर ते मोठ्या पदावर आहेत. कुंदन हे देशमुखांच्या उपस्थितीत पैसे जमा करत असत. तर पालांडें यांनी बदल्यांसंदर्भात पैसे जमा केले आहेत. या प्रकरणात सीबीआय भ्रष्टाचाराचा तपास करत आहे. तर ईडी पैशांचा व्यवहार कसा झाला, कुठे पैसे गुंतवण्यात आले याचा तपास करत आहेत.
हे केवळ एका दोघाचं काम नाही. यात अन्य आरोपींचा सहभाग असल्याने या दोघांची ७ दिवस कस्टडी मिळावी, अशी मागणी ईडीने केली. त्यानुसार आता १ जुलैपर्यंत हे दोघेही ईडीच्या कोठडीत असतील.