गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. गुजरातमधील आणंद शहरातून एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. हा गुप्तहेर भारतातील पाकिस्तानी एजन्सीसाठी काम करत होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्तींचाही एटीएसने शोध घेतला आहे. त्यासाठी संपूर्ण गुजरातमध्ये छापेमारी सुरू आहे. लाभशंकर माहेश्वरी (वय ५३ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या हेराचे नाव आहे.
हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला लाभशंकर माहेश्वरी हा १९९९ मध्ये पत्नीच्या उपचारासाठी भारतात आला होता. त्यानंतर २००६ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले. माहेश्वरीचे आई- वडील पाकिस्तानात राहतात. माहेश्वरी दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. यावेळी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने त्याचे ब्रेनवॉश केले आणि परत येताच माहेश्वरी हेरगिरीत गुंतले होता.
भारतीय सैन्याकडून मिळालेल्या विशेष गुप्त माहितीच्या आधारे एटीएसने त्याला आणंद जिल्ह्यातील तारापूर तालुक्यातून अटक केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करणारा लाभशंकर भारतीय लष्करातील सैनिक आणि अधिकाऱ्यांचे फोन हॅक करून गुप्तचर माहिती गोळा करत असे. त्यासोबतच पाकिस्तानला माहिती पाठवण्यासाठी त्याने भारतीय जवानांच्या हॅक केलेल्या वेगवेगळ्या नंबरचा वापर केला. त्या बदल्यात त्याला पाकिस्तानकडून पैसे मिळत असत.
हे ही वाचा:
एनडीए कॅडेट सैन्य प्रशिक्षणावेळी जखमी; उपचारादरम्यान मृत्यू
कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!
ललित पाटील भावासोबत ड्रग्स फॅक्टरीतून मिळवत होता बक्कळ नफा
ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक
गुजरात एटीएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनेक दिवसांपासून गुप्तहेर म्हणून काम करत होता. एटीएसने आरोपीला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्याने आतापर्यंत किती आणि कोणत्या भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसंबंधी माहिती पाकिस्तानात पाठवली आहे, याची माहिती घेतली जात आहे. आरोपीचा फोन एसएफएलला पाठवण्यात आला आहे.