…..तर विद्यापीठाचा कॅम्पस बॉम्बने उडवून देऊ

…..तर विद्यापीठाचा कॅम्पस बॉम्बने उडवून देऊ

सध्याच्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या उलथापालथीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांना यामुळे कमालीचे नैराश्य आले आहे. या नैराश्यातूनच एका विद्यार्थ्याने विद्यापीठाला असा मेल केला ज्यामुळे विद्यापीठ हादरून गेले होते. मात्र विद्यार्थ्याची मनोवस्था लक्षात घेऊन त्याला केवळ ताकीद आणि नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या बी.कॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर लागला नाही, तर विद्यापीठाचे कॅम्पस बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी एका विद्यार्थ्यानेच दिली आहे. ही धमकी या विद्यार्थ्याने एका इमेलद्वारे दिली आहे. निकाल प्रलंबित असल्याने हा विद्यार्थी मानसिक तणावात होता. या तणावातच त्याने शिवीगाळ करणारा ईमेल पाठवला असल्याने या विद्यार्थ्याला ताकीद आणि नोटीस देत सोडून देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

आज काबुलकडून दिल्लीला येणार शेवटचे विमान

मल्लखांबाचा ऑलिम्पिक मार्ग व्हाया जपान

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

वाणिज्य शाखेच्या एका विद्यार्थ्याने सायबर कॅफेमधून विद्यापीठाला धमकीचा ईमेल पाठवला होता. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाच्या मेलवर हा ईमेल १२ ऑगस्टला प्राप्त झाला होता. यासंबंधी विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या मेलचा तपास केल्यानंतर तो खोट्या तपशीलाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतले. मात्र हा आरोपी एक विद्यार्थी असून मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या या कृत्यामुळे विद्यापीठाचा गलाथन कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. विद्यापीठाकडून सातत्याने विद्यार्थ्यांना निकाल देण्यास, परिक्षांचे वेळापत्रक जाहिर करण्यास अथवा अभ्यासक्रमाशी संबंधित काही माहिती देण्यास विलंब होत आला आहे. याचा विद्यार्थ्यांवर किती मानसिक ताण येतो याची चुणूक या घटनेतून पहायला मिळाली आहे.

Exit mobile version