पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात सिरियाचा हात

आरोपपत्रात एनआयएकडून धक्कादायक खुलासे

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात सिरियाचा हात

पुणे शहरातील इसिस मॉड्यूल प्रकरणी नवीन अपडेट समोर आली असून या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून एनआयएने धक्कादायक दावे केले आहेत. दहशतवाद्यांची एनआयएने केलेल्या चौकशीची माहिती आरोपपत्रानंतर समोर आली आहे.

काही दिवसांपासून पुणे शहरातून काही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. हे सर्व जण इसिस संबंधित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या इसिसच्या सात आरोपींविरुद्ध एनआयएने आरोपपत्र दाखल केले होते. पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात यूएपीए कायद्यासह विविध कलमांतर्गत मुंबईच्या एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी त्या दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती एनआयएने दिली आहे.

पुणे शहरातील कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. पुढे या आरोपींच्या चौकशीतून आणखी काहींना अटक करण्यात आली होती. हे आरोपी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती उघड झाली होती.

त्यानंतर आता पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम याला नुकतीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला. दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते. साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून दहशत निर्माण करण्याचा कट त्यांनी आखला होता. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे.

हे ही वाचा:

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!

दहशतवादी हल्ले करण्यासाठी आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये रेकी केली होती. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचविण्यासह नेमके कुठे स्फोट घडवता येतील, याची चाचपणी देखील रेकी दरम्यान त्यांनी केली होती. तसेच स्फोट झाल्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी सविस्तर योजना आखलेली होती. त्यानुसार त्यांनी दुर्गम भागातील घनदाट जंगलांतील संभाव्य ठिकाणेही निश्चित केली होती. ही ठिकाणी शोधण्यासाठी ड्रोनचाही वापर केला होता.

Exit mobile version